Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा औद्योगिक वसाहतीत कोरोनावरील प्रभावी इंजेक्शन तयार

शिराळा : पत्रकार परिषदेत बोलताना खासदार धैर्यशील माने, दिलीप कुलकर्णी, नंदकुमार कदम, धैर्यशील यादव, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, अभिजित पाटील व इतर.

शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळ्यात तयार होणाऱ्या कोरोनावरील इंजेक्शनला मानवीय चाचणीसाठी नजीकच्या काळात परवानगी मिळणार आहे. 'ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया' आणि 'आयसीएमआर'ची मान्यता मिळून लवकरच येथील आयसेरा बायोलॉजिकल कंपनीत अँटिकोव्हिड सिरम इंजेक्शनच्या उत्पादनास सुरवात होईल, अशी माहिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली. शिराळा औद्योगिक वसाहतीतील आयसेरा बायोलॉजिकल कंपनीस त्यांनी भेट दिली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, माजी जि.प सदस्य अभिजीत पाटील प्रमुख उपस्थित होते.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, या कंपनीत लस तयार करायला मंजूरी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्रालय, टास्क फोर्स आणि सिरम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. आयसेरा कंपनीने या औषधाच्या मानवी चाचणीस परवानगी मागितली असली तरी या कंपनीची नॉलेज पार्टनर पुण्याची सिरम कंपनी आहे. सिरमच्या सहभागाशिवाय आयसेराच्या मागणीची दखल घेतली जाणार नव्हती. शिवाय अशा औषधांच्या निर्मितीसाठी देशभरात जवळपास शंभरावर कंपन्यांनी मागणी केलेली आहे. आयसेरा मधील उत्पादन, वरिष्ठ पातळीवरील चर्चा आणि आमचे सातत्याने सुरू असणारे प्रयत्न त्यामुळे आयसेरा कंपनीतील उत्पादनास नजीकच्या काळात मानवीय चाचणीसाठी परवानगी मिळेल असे दिसून येत आहे. शिराळ्याच्या आयसेरा ची कोरोना लसीला चाचणीच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. नवीन कोरोना स्ट्रेनवर ही प्रभावी ठरणार आहे. गंभीर प्रमाणावर आजारी असणाऱ्या कोरोना रुग्णांनाही याचा फायदा होऊ शकतो.

शिराळा येथील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्लाज्मा थेरपी जर यशस्वी होत असेल तर घोड्याच्या रक्तामध्ये ही प्रतिपिंडे तयार करून ती रुग्णास दिल्यास तो हमखास बरा होईल याचा अभ्यास करून "अँटीकोविड सिरम " नावाखाली कोरोनाची लस बनवली आहे. मात्र ही लस सरकारने औषधाच्या चाचण्या घेण्यासाठीच्या परवानगी प्रक्रियेत अडकली आहे. जर हे औषध आरोग्य यंत्रणेत उपलब्ध झाल्यास अनेक कोरोनाग्रस्ताचे प्राण वाचतील. एवढेच नव्हे तर नवीन कोरोनाच्या स्ट्रेनवर ही लस प्रभावी ठरेल याची खात्री यासंस्थेच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. या कंपनीने चीनमध्ये प्रतिजैविकाच्या वापराने मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आल्याचे सिद्ध करत त्याचाच वापर ही लस बनवताना केला आहे.

सर्पदंश, रेबीज, धनुर्वात, घटसर्प, विंचू दंश यासारख्या रोगांवरील प्रतिपिंडे ही घोड्याच्या रक्तामध्ये त्या रोगाचे विष अथवा जंतू ( मृत अथवा निष्क्रिय ) टोचून बनवली जातात व रोग्याला दिली जातात. अशी औषधनिर्मिती गेल्या कित्येक दशकापासून होत आहे आणि अनेक रुग्ण बरे झाले आहेत. प्लास्मा थेरपी जर यशस्वी होत असेल तर घोड्याच्या रक्तामध्ये ही प्रतिपिंडे तयार करून ती रुग्णास दिल्यास तो हमखास बरा होईल याची खात्री देता येते याचा अभ्यास करून सध्या हि प्रतिपिंडे येथील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने , सिरम इन्स्टिट्यूट , प्रीमियम सिरम यांच्या संयोगाने बनवली आहेत. जगाला आव्हान ठरलेल्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मराठी माणूस पुढे सरसावला आहे. मानवजातीच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या कोरोनाला हरविण्यासाठी प्रतापराव देशमुख, दिलीप कुलकर्णी, नंदकुमार कदम, धैर्यशील यादव यांची आयसेरा कंपनी पुढे सरसावली आहे. ही सांगली जिल्हा तसेच शिराळा तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सरकारने या औषधाच्या चाचण्या घेण्यासाठी प्राथमिकता देणे आवश्यक आहे. त्यास लवकरच परवानगी मिळणार आहे. हे औषध उपलब्ध झाल्यास अनेक कोरोनाग्रस्थांचे प्राण वाचतील याची खात्री आहे. याचबरोबर कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर तसेच गंभीर रुग्णांसाठी हि लस प्रभावी ठरणार आहे.

कंपनीच्या शास्त्रज्ञांनी माहिती देताना सांगितले की, संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाने तयार होणारी लस ही प्रथम प्राण्यांच्या वर चाचणी म्हणून उपयोग करण्यात येणार आहे. नंतर सर्वत्र वापर करण्यात येईल. २०१६ पासुन धर्नुवात, रेबीज, घटसर्प या रोगाची लस तयार करत आहे. आता करोना व्हायरस लागण झालेले रूग्णसाठी ही लस तयार करण्यात आली आहे. चीनमध्ये प्रतिजैविकाच्या वापराने मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे . त्याचाच वापर 'आयसेरा' मध्ये केला जाईल. प्रतिजैविकांच्या वापराने जगभरात दिडशे वर्षापासून विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. वयस्कर व कमी प्रतिकारक्षमतेच्या रुग्णांनाही ती जीवनदायी ठरतील. नवीन कोरोनाच्या स्ट्रेनवर, कोरोनाचे गंभीर रुग्ण, प्रचलित औषधांना प्रतिसाद न देणारे रुग्णांसाठी हे प्रभावी औषध ठरू शकेल. असा विश्वास कंपनीचे संचालक यांनी यावेळी व्यक्त केला . 
--------------------------------
हे औषध संजीवनी ठरेल
प्लाज्मा ऐवजी जर अँटीकोविड सिरम उपलब्ध झाल्यास हे एक संजीवनीसारखे ठरेल. शिवाय हे औषध गुणवत्ता व प्रभावी केल्याने अत्यंत कमी मात्रेमध्ये टोचले तरी याचा गुण येण्यास मदत होईल. आय. सी. एम. आर. व सरकारने परवानगी देऊन हे औषध कसे उपलब्ध करता येईल याबाबत सहकार्य करावे.

- दिलीप कुलकर्णी
संचालक आयसेरा
माजी वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट प्रीमियम सिरम.

Post a Comment

0 Comments