Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, मोठे नुकसान

शिराळा (विनायक गायकवाड) : आज गुरुवारी दुपारी शिराळा तालुक्यात सुरू झालेल्या वादळी पावसाने विजाच्या कडकडाटासह धुमाकुळ घालत तालुक्याला झोडपून काढले आहे. 

भाजीपाला, फळझाडे, घरे व जनावरांचे शेड यासह ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारा, गारा व पाऊस यामुळे शेतातील पिके, झाडावरील आंबा, पत्र्यांचे शेड, गवताच्या गंज्या यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारी तीनच्या सुमारास गडगडाट होऊन जोराचे वारे सुटले. त्याचबरोबर गारांचाही मारा सुरू झाला. त्यामुळे आंबा झाडांचे मोठे नुकसान झाले. झाडाखाली आंब्याचे खच पडले आहेत. तर झाडांना राहिलेल्या आंब्याचे गारांमुळे मार लागुन नुकसान झाले आहे. काही ठिकाणी आडसाली ऊस पडले आहेत, तर झाडे देखिल उन्मळून पडली आहेत.

शिराळा, कापरी, कोकरूड, चिंचोली, बिळाशी, शेडगेवाडी, चरण, आरळा या परिसरातील राहत्या घरांची तसेच जनावरांच्या छतावरील कौले, पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. येळापुर येथे विजेच्या तारा तुटल्याने वीज प्रवाह खंडीत झाला असून अद्याप ही मुसळधार पाऊस सुरु आहे. दुपारी साडे तिनच्या सुमारास पाऊस सुरु झाल्यानंतर अंदाजे चार वाजता भर पावसात वादळी वारे होऊन येळापुर येथील शिवाजी बाबुराव पाटील यांच्या राहत्या घरावरील कौले उडून गेली. तसेच दुकानाचे ही मोठे नुकसान झाले असून अंदाजे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर महादेव पोतदार, मारुती पाटील यांच्या घरावरील कौले व पत्रे उडून गेली आहेत.

तसेच चिंचोली येथील हौसाबाई थोरात यांच्या घरावरील छत उडून गेल्याने एक लाखाचे नुकसान झाले आहे. वादळी वार्‍याने कोकरुड, शेडगेवाडी, हात्तेगांव, मेणी परिसरातील घरांची कौले, पत्रे, झाडे व फांद्या मोडून पडल्या आहेत. येळापुर मार्गे वाकुर्डे बुद्रुकला जाणाऱ्या मार्गावरील विजेच्या तारा तुटल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. कोरोनाने शेतमाल विक्री व्यवस्था कोलमडल्याने भाजीपाला व शेतमालाचे नुकसान झाले असताना परत वादळी वारे, गारा आणी अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.
नुकसानग्रस्त भाजीपाला, फळझाडे, घरे व जनावरांच्या शेडची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा विधानसभा मतदासंघातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments