Daily Mahasatta

Daily Mahasatta

शाब्बास...तुम्ही घडवला इतिहास, भल्याभल्यांना जे जमलं नाही ते तुम्ही करुन दाखवलं

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
कुख्यात गुंडाना तडीपार करत इस्लामपूरातील गुन्हेगारी विश्वाला नेस्तनाबूत करणार्या उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी ' माणुसकीचं नात ' या सामाजिक ग्रुप च्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून चक्क ६६२ बाटल्या रक्त संकलित करत त्यांनी आज हा विक्रम नोंदवला आहे. एखाद्या पोलीस अधिकार्याने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केलेली ही कामगिरी राज्यातील सर्वोत्तम असल्याचे सांगितले जात आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे हे मुळचे हाडाचे शिक्षक. पोलीस अधिकारी झाल्यानंतर देखील त्यांच्यातील शिक्षक कधीही स्वस्थ बसला नाही. तासगाव, जयसिंगपूर, मुंबई ते इस्लामपूर याठिकाणी कर्तव्य बजावत असताना पोलीस अधिकारी म्हणून गुन्हेगारांचा कर्दनकाळ तर शिक्षक म्हणून सामाजिक उपक्रम राबविणारा, हजारो मित्रांचा गोतावळा जमवणारा सच्चा मित्र अशी त्यांची नेहमीच दोन वेगळी रुपे सर्वांना पहायला मिळाली आहेत. अर्थात त्यांच्या ' कृष्णा ' या नावाला साजीशी त्यांची भूमिका राहिली आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर आता राज्यात आणि देशात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी ' माणुसकीचं नातं ' या ग्रुपच्या माध्यमातून इस्लामपूरातील
सर्जेराव यादव मल्टिपर्पज हॉल मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ६६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, उद्योगपती सर्जेराव यादव, पो. नि. नारायण देशमुख यांनी या ग्रुपवरील सदस्यांच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते.

या रक्तदान शिबीरात राजारामबापू ब्लड बँक, इस्लामपूर- ३२४, मानस ब्लड बँक, सांगली- २५४, कृष्णा ब्लड बँक, कराड- ५६ डॉ. डी. वाय. पाटील ब्लड बँक, कोल्हापूर- २८ असे चार ब्लड बँकांच्या माध्यमातून एकूण ६६२ रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले. विशेष म्हणजे भल्याभल्या राजकीय नेतेमंडळीना किंवा सामाजिक संस्थाना जे जमलं नाही ते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी करुन दाखवलं आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक सर्जेराव यादव, प्राचार्य महेश जोशी, पो. नि. नारायण देशमुख, प्रा. डॉ. अशोक शिंदे, पो. कॉ. वारके यांनी शिबिराचे संयोजन केले.

देशात आणि त्याचबरोबर राज्यातील कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रक्तदान शिबीरे न झाल्याने रक्तपेढ्या रिकाम्या पडल्या आहेत. रक्ताचा तुडवडा असून, रक्त मिळत नसल्याने रुग्ण तडफडत आहेत, काहींना जीवही गमवावे लागत आहेत. ही गरज ओळखून श्री पिंगळे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या ग्रुप च्या माध्यमातून गेले वर्षभर असे काम अविरत सुरू आहे. मागील लॉकडाऊन च्या काळात रोजगार करणाऱ्या, हातावरचे पोट असलेल्या, परप्रांतीय हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी या ग्रुपच्या माध्यमातून अनेक मदतीचे हात पुढे आले. आणि जवळ जवळ ४५० कुटुंबाना जेवणाचे, अन्नधान्याचे किट सलग तीन महिने पुरवण्याचे काम केले गेले.
----------------------------------
पिंगळे साहेब...सॅल्यूट

राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रक्ताची नाती देखील दुरावली आहेत. मात्र अशा संकटात देखील पोलीस खात्यातील कर्तव्य बजावत समाजाच्या मदतीसाठी धावून जाणार्या उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे केवळ अभिनंदन न करता दैनिक महासत्ता परिवाराच्या वतीने आपल्या सामाजिक कार्याला कडक सॅल्यूट.

Post a Comment

1 Comments

  1. खूप मस्त काम साहेब 👌👌👌

    ReplyDelete