Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरातच राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये नेतृत्वाचा अभाव

 

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे ) : आजपर्यंतच्या शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या स्व. विजयभाऊ पाटील यांच्यानंतर ही धुरा आता कोण सांभाळणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विजयभाऊ यांनी एकहाती राजकारण करत सलग 30 वर्षे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले. विरोधकही त्यांच्यापूढे नतमस्तक असत. त्यांच्या निधनानंतर आता ही पोकळी कोण भरून काढणार ? हा प्रश्न आहे.

मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडे सलग ३० वर्षे सत्ता होती. पालिकेच्या गेलेल्या निवडणुकीत विकास आघाडी आणि मित्रपक्ष शिवसेनेने राष्ट्रवादीला धक्का देत सत्ता काबीज केली. आता नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असतानाच राष्ट्रवादीमध्ये मात्र नेतृत्वाच्या अभावाने अस्वस्थतेचे वातावरण आहे. विजयभाऊ पाटील यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारस कोण ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. राष्ट्रवादीला एका खमक्या नेतृत्वाची गरज आहे, की जे नेतृत्व ही जबाबदारी योग्य पद्धतीने पेलू शकेल. 

याअगोदर विरोधकांना उमेदवार शोधावा लागत, परंतु गेल्या निवडणकीत राष्ट्रवादीला शह दिल्यामुळे विरोधक विकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. शोधूनही उमेदवार न मिळणाऱ्या विकास आघाडीकडील इच्छुकांची संख्याही मोठी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच फोडाफोडीचे राजकारण हाही महत्वाचा मुद्दा आहे. विकास आघाडीचे अध्यक्ष, पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनीही राष्ट्रवादीला धक्का देणार असल्याचे सूतोवाच केले आहे. मात्र अंतर्गत संघर्षातून विकास आघाडीत सध्या बिघाडी झालेली दिसत आहे. 

विकास आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा, महाडिक गट, शिवसेना, रयत क्रांती संघटना सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचे चित्र आहे. विकास आघाडीच्या या बिघाडीचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो, परंतु राष्ट्रवादीत नगरपालिकेच्या राजकारणात नेतृत्वाचा अभाव असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. आगामी पालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीने याचा विचार करणे गरजेचे आहे. रस्ते, गटारी यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी पालिकेला दिलेल्या १५ कोटी निधीची जोरदार चर्चा आहे. या निधीवरून पालिकेच्या कारभारात दोन्ही गटांकडून श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. घड्याळाच्या टिकटिकला वेग आला आहे. राष्ट्रवादीतील इच्छुकांनी आपापल्या प्रभागामध्ये राजकीय वातावरण गरम करायचे काम सुरू केले आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे वारे सुसाट वेगाने वाहत आहे. स्व. विजयभाऊ पाटील यांच्या राजकीय वारसाची सध्या उत्सुकता असून तो कोण असेल? याचे उत्तर आता येणारा काळच देईल, अशी परिस्थिती आहे.

Post a Comment

0 Comments