Daily Mahasatta

Daily Mahasatta

वीजेचा शाॅक लागून दोघांचा मृत्यू

शिराळा (विनायक गायकवाड) : पाडळी ता. शिराळा येथील दोन युवकांचा विद्युत मोटारीच्या विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३० हे दोघे युवक सकाळी ८ वाजणेच्या सुमारास पाण्याच्या मोटारीकडे गेले असता त्यांना या विद्युत मोटारीचा विजेचा धक्का लागला. हा धक्का इतक्या मोठ्या प्रमाणात बसला की हे दोघे युवक जागीच मृत्यू पावले.

मानसिंग हा येथील विराज फॅक्टरी मध्ये नोकरीस आहे. तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ, असा परिवार आहे तर विक्रम उर्फ जयकर याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सुनील बबन पाटील यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल झांबरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments