Daily Mahasatta

Daily Mahasatta

मटका अड्डे जोमात, हा घ्या पुरावा

" दोन जबरी घरफोड्या, अपघातातील गाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या, मटक्याची घुसखोरी या सगळ्यामुळे शिराळा पोलिस यंत्रणा हतबल असल्याचे चित्र."

शिराळा ( विनायक गायकवाड)

शिराळा शहरात आणि लागून असलेल्या बिऊर गावामध्ये लागोपाठ दोन घरफोड्या झाल्या. लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. चार, आठ दिवसांच्या फरकाने या दोन घटना घडल्या. सोमवारच्या अपघातातील गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडल्या तरीदेखील शिराळा पोलिसांना चोरट्यांचा किंवा आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. मटक्याने तालुक्यात जोरदार घुसखोरी केली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे की काय असेच चित्र सध्या दिसून येत आहे.

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन पोलिस यंत्रणा काम करत असते. मात्र गेल्या महिन्यापासून शिराळा पोलीस यंत्रणा मास्क नसलेल्यांना दंड करण्यातच गुंग आहे. मोबाईल चोर, सोनसाखळी चोर, मोटर सायकल चोर, धमकी देऊन लुटणारे भुरटे, दोन जबरी घरफोड्या यासह इतर घटनेकडे शिराळा पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याची त्यांच्या कामगिरीवरून दिसून येत आहे. पोलिस डायरीला कार्यक्षेत्रातील गावांमधील अनेक गुन्हे व तक्रारी नोंद आहेत मात्र या सगळ्याचा तपास संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

शिराळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गावांसह तालुक्यात मटका खुलेआम घेतला जातो आहे. याची खुमासदार चर्चा सोशल मीडियासह अनेकजण खुलेआम करत आहेत. याला वरदहस्त कोणाचा हे गुलदस्त्यातच आहे. मात्र याचे खापर पोलिस यंत्रणेवर फोडले जात असल्याने त्यांनी योग्य तपास करून मटका पूर्णपणे क्लोज करणे गरजेचे आहे. आठवड्यात दोन घरफोड्या एका अपघातातील आलिशान गाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडणे आणि पोलीस यंत्रणेला याचा शोध लागू नये ही आश्चर्याची बाब आहे.

गेल्या महिन्यापासून शिराळा पोलीस यंत्रणेला आलेली मरगळ आणि वाढलेले गुन्हे याचे भान लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने तात्काळ आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. नवीन अधिकाऱ्यांनी आपले योगदान देऊन सर्वसामान्यांना न्याय व दिलासा देण्याचे काम करावे. अशी मागणी शहरासह इतर ठिकाणी जोर धरू लागली आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे असेही जाणकारांचे मत आहे.

Post a Comment

0 Comments