Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात राजकीय वाद पेटला, न्यायालयात खेचण्याचा दिला इशारा

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : इस्लामपूर नगरपालिकेचा सँड स्टोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नगरसेवकांनी पळविलेला नाही. विकास आघाडीचे नगरसेवक वैभव पवार यांनी बेताल वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल व राष्ट्रवादी काँग्रेस ची बदनामी करू नये. अन्यथा त्यांना न्यायालयात खेचू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजीबापू पाटील यांनी दिला. 

कोरोनाच्या महासंकटात सर्व समाज होरपळत असताना, राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा राजकीय टीका-टिप्पणीचा विषय होणे दुर्दैवी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

श्री. पाटील म्हणाले, इस्लामपूर नगरपालिकेने खाजगी कंत्राटदारास मध्य प्रदेशमधून सँड स्टोन आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याचे काम दिले होते. त्या संबंधीत कंत्राटदाराने हा सँड स्टोन मध्य प्रदेश वरून आणला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतरही काही दगड शिल्लक होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे राज्यातील अद्यावत अशा तहसिलदार इमारतीच्या उदघाटनास इस्लामपूरला आले असता, त्यावेळी क्रेनच्या साह्याने हे दगड उचलून लोकनेते राजारामबापू पाटील नाट्य गृहाच्या पाठीमागे ठेवले आहेत. मग हा दगड पळविण्याचा विषय येतोच कुठे? मी आमच्या पक्षातील कोणा नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्यास आमच्या पक्षातील अनेकांना समाधान वाटणार आहे, असे म्हणणे बालिशपणाचे आहे. नव्हे आमच्या पक्षातील काही जणांच्या समाधानाची तुम्हाला काळजी करण्याचे  कामच काय ? त्यास आम्ही व आमचे नेते समर्थ आहोत.

 इस्लामपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण इस्लामपूर नगरपालिकेने केलेले आहे. हे काम कोणा एका व्यक्तीने अथवा पक्ष, आघाडीने केलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरण कामात नेते, कार्यकर्ते व आंबेडकरी जनतेचे योगदान मोलाचे आहे. या कामासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही मोठा निधी दिला आहे. त्यामुळे कोणी एका- दुसऱ्याने स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा शानदार  लोकार्पण सोहळा होण्याची गरज आहे. मग रात्रीच्या अंधारात आपल्या नावाच्या पाट्या लावून बाबासाहेबांचा पुतळा खराब करण्याचा आपण उद्योग आपण कशाला केला? आपणास प्रशासनाची मान्यता होती, म्हणता. मग प्रशासनाने संबंधीत आर्किटेकवर गुन्हा का दाखल केला?

राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी गेल्या ३१ वर्षात राज्याच्या तिजोरीतून कोटयवधी रुपयांचा निधी आणून या शहराच्या विकासाला मोठी चालना दिली आहे. शहराचा सर्वांगिण विकास घडवून आणला आहे. म्हणून आमची नगरपालिकेत सत्ता येण्यापूर्वी या शहरात २ हजार ५०० प्रॉपर्टी होत्या. आज या शहरात २२ हजार प्रॉपर्टी आहेत. आमच्या पार्टीने तुम्ही म्हणता तसे ३१ वर्षात भोंगळ कारभार केला असता तर तालुक्यातील, जिल्ह्यातील जनतेने या शहरात राहण्यास येण्यास पसंती दिली असती का? आपण गेल्या साडे चार वर्षात विकास आघाडीच्या माध्यमातून शहरात काय उजेड पाडला आहे, हे शहरातील सुज्ञ जनता बघते आहे. नजीकच्या काळात निश्चितपणे आपणास हीच जनता धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही, असा इशाराही श्री पाटील यांनी शेवटी दिला. 

Post a Comment

0 Comments