Daily Mahasatta

Daily Mahasatta

शंभरी गाठलेल्या आजीबाईंच्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

सांगली : येथील १०० वर्षांच्या तंदुरूस्त आजीबाईंसोबत डॉ. सुजय महाडीक.

सांगली (प्रतिनिधी) : येथील भारती हॉस्पिटलमध्ये वय वर्ष १०० असणाऱ्या आजीबाईंच्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी दिली. 

शंभर वर्षाच्या आजीबाई घसरून पडल्याने डावा खुबा फ्रॅक्चर झाला होता. मग आता यावर उपाय काय करायचा म्हणून त्यांचा परिवार चिंतेत होता. आजीबाईंच्या वयाचा विचार करता कोणतेही डॉक्टर ऑपेरेशन करण्यासाठी धजावत नव्हते. नातेवाईकांनी तात्काळ भारती हॉस्पिटल येथे आजीबाईंना आणले. त्यांची तपासणी केली आणि येथील डॉक्टरांनी ऑपरेशन करायची तयारी दर्शवली. 

आता वय वर्षे १०० म्हणल्यावर थोड डॉक्टरांसमोर आव्हान होतच. मात्र ऑर्थोपेडीक विभागप्रमुख डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुजय महाडीक यांनी ते लीलया पेलले. भूलतज्ज्ञ डॉ. प्रशांत लोमटे यांचेही सहकार्य लाभले. डॉ. सुजय महाडीक म्हणाले, साधारणपणे हिप रिप्लेसमेंटसाठी दीड तासांचा अवधी लागतो परंतु रुग्णाचे वय लक्षात घेता ती शस्त्रक्रिया ४० मिनिटात आम्ही यशस्वी केली.

नवीन खूबा बसवल्यानंतर त्या आजीबाई लगेच दुसऱ्या दिवशी चालू लागल्या. आता त्यांना कोणताही त्रास होत नसून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारती हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शहाजी देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उपाधिष्ठता डॉ. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. भारती हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्री असून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी आता पूणे- मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही. सर्व आजारांवरील उपचाराची सोय एकाच छताखाली उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments