Daily Mahasatta

Daily Mahasatta

पन्नास तासाच्या प्रयत्नानंतर गव्याचे प्राण वाचवविण्यात यश

 

शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथे मरणासन्न अवस्थेत आढळलेल्या जंगली गव्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या वैद्यकीय पथकाला यश...

शिराळा (विनायक गायकवाड) : शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथे मरणासन्न अवस्थेत आढळलेल्या जंगली गव्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या वैद्यकीय पथकाला यश...

पेरीड ( ता . शाहूवाडी ) येथील स्मशानभूमी परिसरात मरणासन्न अवस्थेत आढळलेल्या गव्याचे प्राण वाचविण्यात वनविभागाच्या पशुवैद्यकीय पथकाला यश आले आहे. मंगळवारी सकाळी मलकापूर शहरातील राजवाड्याजवळ आलेल्या ४ गव्यांना पूर्ववत जंगलाच्या दिशेने हुसकावताना यातील दोन वर्षांचा गवा वाट चुकून सैरभैर पळाल्यामुळे शरीरातील पाणी व क्षार कमी होऊन निपचित पडला होता . त्याचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाला ग्रामस्थांच्या मदतीने सलग ५० तासांची शर्थ करावी लागली. हा गवा अद्यापही पेरीड गाडेवाडी जवळच्या जंगलात वैद्यकीय पथकाच्या निगराणीत असल्याचे मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी सांगितले . 

दरम्यान गव्याचे डी - हायड्रेशन, अतिउष्णतेमुळे वाढलेली हृदयाची स्पंदने तातडीने कमी करण्यासाठी मलकापूर पालिकेचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला होता. पाण्याच्या फवाऱ्याद्वारे गव्याच्या शरीराचे तापमान नियंत्रणात आणले गेले. परंतु प्रकृती खालावत चालल्यामुळे स्थानिक पशुवैद्यकाच्या मदतीने काही सलाईन व प्रतिजैविकांची मात्रा दिली गेली. यावेळी वनक्षेत्रपाल नलवडे यांनी वरिष्ठ कोल्हापूर कार्यालयाकडील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . संतोष वाळवेकर यांच्या पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले. 

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर - ट्रेलरमधून मंगळवारी रात्री पावणेतीन वाजता गव्याला जंगल हद्दीत नेऊन वैद्यकीय उपचार करण्यात आले. तब्बल ५० तासांच्या मॅरेथॉन उपचार प्रयत्नांनी गव्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे पाहून पशुवैद्यकीय पथकासह वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील तणावाची जागा आनंद आणि समाधानाने घेतल्याचे पाहायला मिळाली. डॉ. माळी, डॉ. खोत, संजय कांबळे (वनपाल), राजाराम राजिगरे, जालिंदर कांबळे (वनरक्षक), विठ्ठल वारकरी, शाहिद मिस्त्री, बाळू भोसले यांनी यासाठी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments