Daily Mahasatta

Daily Mahasatta

अन्यथा तीव्र आंदोलन करू : दत्तकुमार खंडागळे यांचा इशारा

विटा (प्रतिनिधी)
विट्यातील खासगी कोविड हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी दिला आहे.

दत्तकुमार खंडागळे म्हणाले, खानापुर तालुक्यात आणि विटे शहरात गेल्या काही दिवसात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. कोरोना हा साथीचा रोग असून तो गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. कोरोनाचे उपचार आणि त्याचा खर्च गोर-गरिबांना परवडणारा नाही. विट्यातील शासकीय रूग्णालयात फारशा सुविधा नाहीत, अतिदक्षता विभाग नाही, पुरेशे व्हेंटीलेटर, ऑक्सीजन बेडची व्यवस्था नाही. त्यामुळे सरकारी रूग्णालयातून रूग्णांना खासगी रूग्णालयात पाठवण्यात येत आहे.

सदर हॉस्पिटलचा खर्च हा गोरगरिबांना परवडणारा नाही. त्यामुळे विट्यातील सर्व खासगी कोविड रूग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू करावी अन्यथा विटा तहसिल कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन करावे लागेल. कोविडचे उपचार घेण्याइतपत गोरगरिबांची स्थिती नाही. त्यांना उपचाराचा खर्च करण्यापेक्षा मरण जवळचे वाटते. परिणामी अनेक रूग्णांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या रूग्णालयामध्ये जर महात्मा फुले जन आरोग्य योजना नाही चालू केली तर अनेक रूग्ण उपचारा अभावी मरतील.

त्यामुळे या सगळ्याचा विचार करून विटा येथील ओमश्री हॉस्पिटल, वारे हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल आणि नव्याने सदगुरू हॉस्पिटल येथे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहेत. या सर्वच ठिकाणी महात्मा फुले जन-आरोग्य योजना चालू करून गोरगरिबांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रहारचे संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments