इस्लामपूर, ( सूर्यकांत शिंदे )
वाळवा तालुक्यात ४५ वर्षे वयावरील सर्व लोकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामधील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण व्यवस्था सुरू असून संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार रविंद्र सबनीस तसेच गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे. तालुक्यातील सुमारे १९ हजार लोकांनी लसीकरन करून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, वाळवा तालुक्यातील मुख्य आरोग्य केंद्र वगळता नागाव, मर्दवाडी, शिगाव, कोरेगाव, भडकंबे, शिरगाव, जुनेखेड, साखराळे, ताकारी, सुरुल, रेठरे धरण, तांबवे, बहे, काळमवाडी, येडेनिपाणी, बहादूरवाडी, ऐतवडे बुद्रुक, चिकूर्डे, कार्वे, रेठरे हरणाक्ष, नरसिंहपूर या उपकेंद्राच्या ठिकाणी सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी लसीकरण सुरू करत आहोत. वाळवा तालुक्यातील १ लाख ४ हजार लोकांचे लसीकरण करायचे आहे. सद्यस्थितीमध्ये १८ हजार ९०० लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व लोकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा. सर्वांनी लसीकरण घेतल्यास कोरोनाच्या धोक्यापासून सुरक्षित होतील.
लसीकरण मोहिमेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन तहसिलदार, गटविकास अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने वाळवा तालुक्यातील सर्व सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
■■■■■
0 Comments