Daily Mahasatta

Daily Mahasatta

बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा : तहसीलदार गणेश शिंदे

शिराळा : तहसीलदार गणेश शिंदे यांनी सुरुल तलाव परिसरात भेट देऊन बेकायदेशीरपणे पाणी उपसा करणारे विद्युत पंप याची पाहणी केली.

शिराळा (विनायक गायकवाड) : तालुक्यातील भटवाडी हे उत्तर विभागातील गाव आहे. या गावाला सुरुल ता. वाळवा येथील तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावाचे बॅकवॉटर करमाळे व भटवाडी ता. शिराळा हद्दीत येते तर बंधारा सुरूल ता. वाळवा हद्दीमध्ये आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने मे महिन्यात पाणी कमी पडणार हे ध्यानात घेऊन भटवाडीचे सरपंच विजय महाडिक यांनी शिराळा तहसीलदार गणेश शिंदे तसेच वाळवा तहसीलदार रवींद्र सबनीस यांना भविष्यातील पाणी टंचाईबाबत सुरूल तलावातून पुरेसा पाणी पुरवठा कसा करता येईल याबाबत प्रत्यक्ष भेटून पत्र व निवेदनाद्वारे कळविले होते.

त्यानुसार शिराळा तहसीलदारांनी आज सरपंच विजय महाडिक व इतर पदाधिकारी यांच्या समवेत सुरुल तलावास भेट दिली. या भेटी दरम्यान तलावाच्या ठिकाणी विनापरवाना पाणी उपसा करणारे जवळपास ८ पाणी उपसा पंप दिसून आले. हे विनापरवाना पाणी उपसा पंप वेळीच बंद केले नाही तर भटवाडी गावाला भविष्यात पाणीपुरवठा करण्यास अडचणी येतील. हे लक्षात घेऊन शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांनी सुरुल तलावातील विनापरवाना सुरु असलेल्या पाणी उपसा पंप मालकांच्यावर कायदेशीर कारवाई करून पाणी उपसा पंप जप्त करावेत व तेथील विद्युत कनेक्शन बंद करावे, असे वाळवा तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
............................

सुरूल तलाव वाळवा तालुका हद्दीत येत असल्यामुळे बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या पंप मालकांच्या वर कारवाई करण्यासाठी वाळवा तालुक्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यानुसार त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल आणि त्याच बरोबर भटवाडी गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील. पाणी टंचाई जाणवू दिली जाणार नाही.
- गणेश शिंदे, तहसीलदार शिराळा.
.........................

मे महिन्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना म्हणून सरपंच या नात्याने गावाच्या वतीने वाळवा तहसीलदार शिराळा तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून, पत्र व निवेदनाद्वारे संबंधित घटना सांगितली होती. त्यानुसार शिराळा तहसीलदार यांनी आज घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून भविष्यातील पाणी टंचाई जाणवू न देण्याचे आश्वासन दिले आहे.
- विजय महाडिक, सरपंच भटवाडी.

Post a Comment

0 Comments