Daily Mahasatta

Daily Mahasatta

कचरा कुंडीत वापरलेले पीपीई किट टाकल्याने १ लाखाचा दंड


सांगली ( प्रतिनिधी)
गणेशनगर स्विमिंग टॅंकच्या पिछाडीस असणाऱ्या महापालिकेच्या कचरा कुंडीत वापरलेले पीपीई किट टाकण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणला. यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. तसेच पीपीई किट टाकण्यासाठी आलेल्या आदित्य डायगणोस्टिकला १ लाखाचा दंड करण्याचे आदेश दिले तसेच आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून आदित्य डायगणोस्टिकचा परवाना रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.

शुक्रवारी सायंकाळी गणेशनगर येथील रोटरी क्लबच्या पिछाडीस असणाऱ्या महापालिकेच्या कचरा कंटेनरमध्ये सायंकाळी 6 च्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल समोरील आदित्य डायगणोस्टिक सेंटरची अंबुलन्स क्रमांक एमएच 08 डबल्यू4601 यामधून डायगणोस्टिक सेंटरमध्ये वापरलेले 3 पीपी किट आणि अन्य वैद्यकीय कचरा टाकण्यासाठी आली होती. यावेळी अम्ब्युलन्स चालक प्रकाश अवघडे हे कचरा टाकत असताना स्थानिक नागरिकांनी ते पाहिले. यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध करीत ती अम्ब्युलन्स रोखून धरली.

यानंतर स्थानिक नगरसेवक फिरोज पठाण, बिरेंद्र थोरात यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना नागरिकांनी बोलावून घेतले. महापौर सूर्यवंशी यांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन आरोग्य निरीक्षक अंजली कुदळे यांना बोलावून घेऊन संबंधित डायगणोस्टिक सेंटरला 1 लाखाचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला . तसेच मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून आदित्य डायगणोस्टिकचा परवाना रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. तर हा प्रकार वारंवार घडत असल्याने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
-------------------------------
परवाना रद्द करण्यासाठी
प्रयत्न करणार : महापौर


आदित्य डायगणोस्टिक सेंटरकडून वापरलेले मेडिकल वेस्ट कचरा कंटेनरमध्ये टाकला जात आहे. याबद्दल 1 लाखाचा दंड ठोठावला आहेच शिवाय सोमवारी आदित्य चा परवाना रद्द करण्याबाबत आयुक्त कापडणीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments