Daily Mahasatta

Daily Mahasatta

अनिलभाऊंचा एक फोन आणि ' काम खल्लास '

विटा (प्रतिनिधी) : आमच्या नेत्याचा एक फोन आणि ' काम खल्लास ' हा आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या कामाचा पॅटर्न असल्याचे त्यांचे कार्यकर्ते अभिमानाने सांगत असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा मतदारसंघातील नागरिकांना आला. आजाराने ग्रासलेल्या एका मजुर कुटुंबाला रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी अनिलभाऊंनी प्रशासनाला आदेश दिला आणि कोरोनाच्या संकटामुळे सुरु असलेल्या धावपळीतून वेळ काढत तहसीलदार ॠषिकेत शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता या कुटुंबाला रेशनकार्ड दिले.

खानापूर मतदारसंघातील एक कुटुंब मजुरीसाठी परगावी वास्तव्यास आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीला आजाराने ग्रासले आहे. लाखो रुपयांचा खर्च न परवडणारा असल्याने या कुटुंबाला शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड ची गरज होती. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सेतु कार्यालयातील काम सुरु नसल्याचे त्यांना समजले. तहसीलदार ॠषिकेत शेळके देखील चोवीस तास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ' ऑन द फिल्ड ' असल्याने त्यांची भेट होत नव्हती. 

रेशनकार्ड मिळत नसल्याने हतबल झालेल्या त्या व्यक्तीने अखेर आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पुढे जाऊन आपली कैफियत मांडली. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी रेशनकार्ड तातडीने मिळणे किती गरजेचे आहे, हे भाऊंना सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार अनिलभाऊ बाबर यांनी तहसीलदार शेळके यांना संबंधित व्यक्तीला तातडीने रेशनकार्ड देण्याची सूचना केली. 

तहसीलदार ॠषिकेत शेळके यांनी देखील सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन घेत संबंधित गरजू व्यक्तीला तात्काळ रेशनकार्ड देऊन गतिमान प्रशासनाचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. अर्थातच मतदारसंघातील नागरिकांचे काम लहान आहे की मोठे ? संबंधित व्यक्ती आपल्या गटाचा आहे की विरोधातला ? याची कोणतीही विचारपूस न करता प्रशासनाला 'एक फोन आणि काम खल्लास ' हा त्यांच्या कामाचा पॅटर्न सद्या चर्चेचा विषय आहे.

Post a Comment

0 Comments