Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीकरांच्या सेवेत पुन्हा भगवान महावीर कोविड हाॅस्पिटल दाखल होणार

सांगली (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोना महामारीने जनता भयभीत झाली अशा कठिण समयी सुरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुसज्ज असे भगवान महावीर कोविड हाॅस्पिटल उभारण्याचा संकल्प केला. अवघ्या पंधरा दिवसांत समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करुन सुमारे ७५ लाखांची अत्याधुनिक साहित्य साधने जमविली आणि सांगलीकरांच्या सेवेसाठी भगवान महावीर कोविड हाॅस्पिटल सुरू करुन सहजासहजी रुग्णांना बेडस उपलब्ध होत नव्हते अशा अत्यंत अडचणीच्या काळात २७५ रुग्णांना कोरोना मुक्त करुन बहुमोल योगदान व जीवदान दिले होते. 

यावर्षी पुन्हा कोरोना संसर्ग बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा सुरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आणि राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या सहकार्याने लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद काॅलेज लेडीज होस्टेल नेमिनाथ नगर राजमती भवनासमोर सांगलीच्या प्रांगणात भगवान महावीर कोविड हाॅस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करुन हाॅस्पिटल उभारणीच्या कामाचा संकल्प केला. या कामी महापालिका आयुक्त मा़. नितीन कापडणीस आणि जिल्हाधिकारी मा. अभिजित चौधरी साहेब यांचे सहकार्य आहे, हे हाॅस्पिटल सुरू करण्यास प्रशासनाची मंजूरीही मिळाल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. 

प्रारंभी ३० बेडसची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्यामध्ये १५ बेडस आयसीयू व्हेंटीलेटर युक्त व १५ आॅक्सिजनयुक्त बेडस व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. रुग्णांसाठी शुध्द शाकाहारी मोफत भोजन व्यवस्था, डॉ. पवन गायकवाड यांचेकडून रुग्णांचे मानसिक समुपदेशन व आरोग्य प्रबोधन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संयोजक सुरेश पाटील यांनी सांगितले. हे भगवान महावीर कोविड हाॅस्पिटल लवकरच सांगलीकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. 

या कोविड हाॅस्पिटलसाठी तज्ञ व अनुभवी डाॅक्टरांची टीम असणार आहे.. त्यामध्ये डाॅ. वैशाली सोमनाथ कोरे,डॉ. नीरज व डॉ. दिनेश भबान,डॉ. राहुल पाटील, डॉ. प्रीतम आडसुळे, डॉ. बी. एस. पाटील, डॉ अमोल सकळे व डॉ अमोल पाटील या धनवंतरींचा लाभ रुग्णांना होणार आहे.. या सर्व सेवाभावी डाॅक्टरांनी हे काम आनंदाने स्वीकारले आहे. या कोविड हाॅस्पिटलचा संकल्प करताना संयोजक सुरेश पाटील, सुभाष बेदमुथा, जितेंद्र जैन नाणेशा, डॉ. दिनेश भबान, डॉ. राहुल पाटील, मनोज पाटील, अजित पाचोरे, वसंत पाटील, सुभाष देसाई, राजगोंडा पाटील, ए. बी. पाटील, आदिनाथ उपाध्ये, महावीर भंसाळी उपस्थित होते. 
भ.महावीरांचा'' जगा व जगू द्या '' हा विचार साक्षात कृतीत उतरविणाऱ्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून अनेकांनी पुन्हा मदतीची तयारी दाखवली आहे.

Post a Comment

0 Comments