Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलूस मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

पलुस (अमर मुल्ला) : पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक टी. जे. करांडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक व्ही. एस. गुरव , ए. जे. सावंत, ए. के. बामणे, बी. डी. चोपडे ,सौ. पी. व्ही. नरुले, सौ. अलका बागल ,अविनाश चव्हाण , सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. 

यावेळी जेष्ट शिक्षक ए. के. बामणे सर, कु. जान्हवी कोळी, कु. समृद्धी चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ए. के. बामणे म्हणाले, भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी आहेत. ६५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य खूप महान आहे .आचार-विचारांत राष्ट्रप्रेम,राष्ट्रनिष्ठा ठासून भरलेली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांचा अंगीकार केला. त्यांच्या विचारांना एका चौकटीत बसवू नये. लोकशाही रुजविण्यापासून ते सर्वांगीण शिक्षणापासून ते समानतेच्या विचारापर्यंत प्रत्येक विचारात डॉ. आंबेडकर यांचे प्रतिबिंब उमटले आहे, "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या त्रिसूत्रीवर भर देत प्रगती आणि विकास साधण्याचा विचार दिला. 

डॉ. आंबेडकर यांचे सर्वच विचार समाजासाठी गरजेचे आहेत. त्यांच्या विचारांनीच आज देश बदलला आहे. कोणतेही काम हाती घेतले आहे ते पूर्णत्वास न्या, असा विचार डॉ. आंबेडकर यांनी मांडला. हा विचार आधी तरुणांनी आत्मसात करायला हवा. जयंतीपुरते त्यांचे विचार आठवण्यापेक्षा आयुष्य त्यांच्या विचारांनी घडवावे. समानता आणि बंधूता जिथे नांदते, तो देश प्रगती करतो, असा विचार डॉ. आंबेडकरांचा होता. मानव सेवा, त्यांचा आदर करणे आणि माणसाला माणसाशी जोडणे, हा विश्‍वास डॉ. आंबेडकर यांनी रुजवला. 

त्यांनी दिलेल्या वाटेवर आपण चालले पाहिजे. माणसांची सेवा करताना जात बाजूला ठेवावी आणि सेवा करत राहायचे, ही गोष्ट सामान्य आयुष्यातही अंगीकारावी. आपण आदर दिला तर आपल्याला आदर मिळतो आणि आपण काम केले तर त्याचे फळ मिळतेच. डाॅ. आंबेडकर यांचे विचार आताच्या पिढीला नाहीतर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी गरजेचे आहेत. डॉ. आंबेडकर यांचे विचार आधी तरुणांनी आत्मसात करायला हवे. त्यांच्या विचारांना एका चौकटीत न अडकवता मुक्त अवकाश द्यावा. हीच त्यासाठी आपण दिलेली खरी पोचपावती असेल असे मत ए. के. बामणे यांनी व्यक्त केले आहे.

आभार बी. डी. चोपडे यांनी मानले. यावेळी प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षक, सर्व शिक्षिका उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments