Daily Mahasatta

Daily Mahasatta

भारतीचे डॉ. रणजित पाटील यांचा अमेरिकेत होणार सन्मान

सांगली (प्रतिनिधी) : अमेरिकन युरॉलॉजी असोसिएशन आणि युरॉलॉजी केअर फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा २०२१ मानवतावादी पुरस्कारासाठी डॉ. रणजित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. भारती हॉस्पिटलमध्ये केलेल्या रुग्णसेवेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

युरॉलॉजी क्षेत्रात अनुकरणीय आणि मानवतावादी काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. हा मान मिळवणारे डॉ. रणजित पाटील पहिले भारतीय ठरले आहेत. भारती हॉस्पिटल सांगली येथे गरीब व दारिद्र्य रेषेखालील रुग्णांवरती कोरोना आणि लॉकडाउन काळात त्यांनी उपचार केले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना ते स्वतः पॉझिटीव्ह आले. त्यावर मात करून पुन्हा ते रुग्णसेवेत हजर झाले. इतर रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून त्यांच्यावर देखील उपचार त्यांनी केले आहेत. डॉ. पाटील यांनी एम. सी. एच. युरोलॉजी हा तीन वर्षांचा सुपर स्पेशालिटी कोर्स केला असून ते मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियातर्फे प्रमाणित मूत्र रोगावरील आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील काही मोजक्या डॉक्टरांपैकी ते आहेत.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना युरॉलॉजी या विषयात मोफत प्रशिक्षण दिल्याबद्दल अमेरिकन संस्थेने त्यांचे कौतुकही केले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सप्टेंबर २०२१ मध्ये लॉस वेगास नेवाडा येथील होणाऱ्या ए. यु. ए. २०२१ कॉन्फरन्समध्ये संपन्न होणार आहे.

Post a Comment

0 Comments