Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत दुधनकर हॉस्पिटलला १ लाखाचा दंड

सांगली (प्रतिनिधी) : आपल्या रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा मनपाच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल शिंदेमळा येथील दुधनकर हॉस्पिटलला महापालिकेने १ लाखाचा दंड केला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
शिंदे मळा येथील दुधनकर हॉस्पिटलने आपल्या रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा हा महापालिकेच्या घंटागाडीत टाकून घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केला. याची माहिती मिळताच आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे आणि स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी याबाबत पडताळणी केली असता हा बायोमेडिकल कचरा दुधनकर हॉस्पिटलचाच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार दुधनकर हॉस्पिटलला १ लाखाचा दंड करण्यात आला आहे. या दंडाची वसुली स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी केली.

हॉस्पिटलचा कचरा उघड्यावर टाकल्यास कारवाई: आयुक्त कापडणीस
महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल प्रशासनाने आपल्या हॉस्पिटल मधील बायोमेडिकल कचरा हा उघड्यावर किंवा महापालिकेच्या कचरा कंटेकर अथवा घंटागाडीमध्ये न टाकता यासाठी नियुक्त सुर्या एजन्सीकडे जमा करायचा आहे. याचे उल्लंघन झाल्यास त्या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई बरोबर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.

Post a comment

0 Comments