Daily Mahasatta

Daily Mahasatta

पृथ्वीराज फौंडेशनची सांगली महापालिकेच्या मदतीसाठी धाव

सांगली (प्रतिनिधी) : सांगली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या होमयसोलेशनच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वीराज पाटील फौंडेशन महापालिकेच्या मदतीला आले आहे. या अंतर्गत पृथ्वीराज पाटील फौंडेशन व स्व. गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजचे डॉक्टर , शिकावू विद्यार्थी, नर्सेस हे आता होमयसोलेशनच्या रुग्णाची काळजी घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत. 

शुक्रवारपासून कॉलेजच्या ६१ जणांची टीम महापालिका क्षेत्रात कार्यरत झाली असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. तसेच या टीममुळे होमयसोलेशन असणाऱ्या व्यक्तींची काळजी घेण्याबरोबर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि वैद्यकीय मदतही केली जाणार आहे. शुक्रवारी हनुमान नगर आरोग्य केंद्रामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात या अभियानाचा शुभारंभ मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि स्व. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

यावेळी स्थानिक नगरसेवक अभिजित भोसले, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पृथ्वीराज धनवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ शीतल धनवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात 1500 पेक्षा अधिक होमयसोलेशनचे लोक आहेत. यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. कमी लक्षणे किंवा काहीच लक्षणे नसणारे पॉझिटिव्ह रुग्ण होमयसोलेशनचा पर्याय निवडतात. त्यामुळे होमयसोलेशन असणाऱ्या व्यक्तींची काळजी आणि ते नियमांचे पालन करतात का यावर महापालिकेच्या आशा वर्कर लक्ष ठेवत असतात. एका एका प्रभागात 125 ते 150 च्या आसपास होमयसोलेशनची संख्या असल्याने आशा वर्कर यांना सर्वत्र पोहचणे शक्य होत नाही. त्यातच अनेक ठिकाणी होमयसोलेशन व्यक्तीकडून नियमांचे पालन होत नसल्याचे प्रकार समोर येत होते. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि स्व. गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजकडून होमयसोलेशनसाठी त्यांचे डॉक्टर, नर्सेस तसेच शिकावू विद्यार्थी हे महापालिकेच्या मदतीसाठी पाठवणेत आले आहेत. यामुळे होमयसोलेशन असलेल्या प्रत्येक रुग्णांवर दैनंदिन लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फौंडेशन स्व. गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजचे प्रमुख पृथ्वीराज पाटील यांचे आभारही आयुक्त कापडणीस यांनी मानले.

याबाबत बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, प्रत्येक प्रभागात आमचे 2 डॉक्टर, 2 नर्सेस आणि अन्य स्टाफ यांच्याकडून गृहभेटी देऊन होमयसोलेशन असणाऱ्या व्यक्तीची काळजी घेतली जाईल तसेच लक्षही ठेवले जाईल. याचबरोबर आमच्या कॉल सेंटरमधून त्यांना दिवसातून तीनवेळा कॉलसुद्धा जाईल. महापालिका क्षेत्रातील मनपाच्या 10 दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात आमचे 21 डॉक्टर आणि 20 नर्सेस व अन्य असा 61 जणांचा स्टाफ सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असणार आहे. आमच्या स्टाफसोबत एक आशा वर्करसुद्धा असणार आहे. याचबरोबर होमयसोलेशन असणाऱ्या रुग्णांना फौंडेशनकडून व्हिटॅमिन सी, जे आणि अर्सेनीक अल्बमचा समावेश असणारे किटसुद्धा मोफत दिले जाणार आहे. 

यावेळी पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि स्व. गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजचे डॉ. जीनेश्वर एलिगोडा, डॉ सुहास पाटील, डॉ संतोष भोजगे, डॉ प्रताप भोसले, नर्सिंग स्टाफ शैलेंद्र मालप, सोनिया भोरे, प्रफुला आवळे, तृप्ती कुरणे, प्रतीक्षा लोखंडे, रोहिणी मोरे, आफ्रिन मंगळवारे , बिपिन कदम, आयुब पटेल, रवि खराडे आशिष चौधरी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments