Daily Mahasatta

Daily Mahasatta

लाॅकडाऊन विरोधात, पृथ्वीराज पाटील ' मैदानात '

 

सर्व व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले हे प्रशासनाचे सर्व नियम पाळून व्यापार करत आहेत आणि यापुढेही करतील. तरी त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत व्यापार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. 

 सांगली, (प्रतिनिधी) : सांगली शहर आणि जिल्ह्यातील सर्व व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले यांना कोरोना काळातही सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत व्यापाराकरीता तसेच हॉटेल व्यावसायिकांना पार्सल देण्याची वेळ रात्री १० वाजेपर्यंत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना मुंबईत मंत्रालयात भेटून केली आहे. 

श्री. पाटील यांनी आज मंत्रालयात ना. वडेट्टीवार यांची भेट घेतली आणि त्यांना व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शासनाचे आत्ताचे आदेश हे व्यापार्‍यांच्यादृष्टीने हिताचे नसल्याने त्यांना वेळ वाढवून देऊन व्यापार करण्यास मुभा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या निवेदनात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे ५८ टक्के व्यापारी व उद्योजकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. मागील वर्षी आपण लॉकडाऊन काळात रेड झोन, ब्लू झोन व ग्रीन झोन अशा पध्दतीचे वर्गमापन केले होते. त्यानुसार ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे, असे जिल्हे वगळून इतर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते. त्याच धर्तीवर सध्या सांगली जिल्ह्यात मुंबई, पुणे, लातूर या जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोना रूग्ण फार कमी आहेत, म्हणून या जिल्ह्याकरीता लावण्यात आलेले लाॅकडाऊनचे नियम हे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण कमी आहेत तेथे लावण्यात येवू नयेत. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असल्यामुळे या ठिकाणी सर्व व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले यांना सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत व्यापार करण्यास परवानगी द्यावी.


श्री पाटील यांनी म्हटले आहे की, व्यावसायिक व याठिकाणी काम करणारे कामगार व कर्मचारी यांच्यावर प्रशासनाने महिनाभर सगळेच व्यवहार बंद ठेवायला भाग पाडले, तर परिस्थिती गंभीर होईल. रोजचे हातावरचे पोट असणारे कामगार, गरीब मजूर, छोटे व्यापारी यांची आर्थिक स्थिती आधीच नाजूक आहे, त्यात या लॉकडाऊनमुळे ती आणखी कठीण होईल व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. 

सर्व व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले हे प्रशासनाचे सर्व नियम पाळून व्यापार करत आहेत आणि यापुढेही करतील. तरी त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत व्यापार करण्यास परवानगी द्यावी, तसेच हॉटेल व्यावसायिकांना पार्सल देण्याची वेळ रात्री ८ वाजेपर्यंत दिली आहे, ती वाढवून रात्री १० वाजेपर्यंत करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments