Daily Mahasatta

Daily Mahasatta

सुरूल तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा, तहसीलदारांची मोठी कारवाई

शिराळा (विनायक गायकवाड) : भटवाडी ता. शिराळा या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सुरूल येथील तलावात बेकायदेशीररित्या शेतीला पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दोन विद्युत मोटरी व तारेवर आकडे टाकलेली केबल असे साहित्य तहसीलदार गणेश शिंदे, रवींद्र सबनीस यांच्या आदेशानुसर जप्त करण्यात आले.

मंडलाधिकारी सुरेश शेळके, तलाठी माधुरी गुजर व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र देवकर यांच्या पथकाने ही कारवाई करून मोटारी पाईप इलेक्ट्रिक केबल ताब्यात घेत त्या जप्त केल्या आहेत. सुरूल गावच्या पश्चिमेला करमाळे रस्त्यालगत हा तलाव आहे. या तलावातील पाण्याचा भटवाडी ता. शिराळा या गावास पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या प्रचंड उन्हाळा पडला असून मे महिन्यात पाणीटंचाई जाणवू शकते म्हणून भटवाडीचे सरपंच विजय महाडिक यांनी शिराळा व वाळवा तहसीलदार यांना संभाव्य पाणीटंचाईबाबत पत्र दिले होते. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांनी सुरूल तलावास भेट देऊन पाहणी केली असता त्यांना या तलावात बेकायदेशीरपणे विद्युत पंप शेतीसाठी पाणी उपसा करताना दिसून आले. याची गंभीर दखल घेत त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सदर सूचनेवरून संबधित पथकाने तहसीलदार यांचे आदेशाने तलावाच्या पाण्यातील दोन पाणी उपसा करणारे पंप , लाईटच्या डांबावर आकडे टाकून विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल व शेतात पाणी नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईप जप्त केल्या आहेत. संदीप शिवाजी पाटील, तुकाराम पांडुरंग पाटील, खंडू बापू पाटील रा. सुरूल ता. वाळवा या शेतकऱ्यांनी बेकायदेशीरपणे पाण्यात पंप टाकून पाण्याची व लाईटची चोरी केली असल्याचे दिसून आले. मंडल अधिकारी महावितरण, सुरूल ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कर्मचारी यांनी कारवाई केली.

Post a Comment

0 Comments