Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूर, आष्टा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची होणार अँटिजेन चाचणी

इस्लामपूर (सुर्यकांत शिंदे) : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. यावर प्रशासनाने कडक भूमिका घेत इस्लामपूर व आष्टा शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता कोरोनाची रॅपिड अँटिजेन चाचणी घेण्याचा निर्णय तहसीलदार रवींद्र सबणीस यांनी घेतला आहे व त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

राज्यात कडक संचारबंदी लागू आहे, तरीपण काही लोक मोटारसायकलवरून विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यांच्याकडून शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. सर्व नियम धाब्यावर बसवत असे लोक मोकाट फिरत असतात. असे विनाकारण फिरणारे व कोणतीही लक्षणे दिसत नसलेले लोक कोरोनाचा फैलाव करण्यास कारणीभूत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी अशा लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाणे इस्लामपूर व आष्टा शहरात पोलीस व आरोग्य विभागाची संयुक्त पथके तयार करून अशा लोकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करून यामध्ये ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्याची रवानगी कोविड केअर सेंटरला करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. रवींद्र सबणीस यांनी तशा आशयाचे पत्र पोलीस निरीक्षक इस्लामपूर व आष्टा, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर व आष्टा यांना देण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments