Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतकऱ्यांच्या सात - बारा उताऱ्यातील अडचणी सोडवा : सत्यजित देशमुख

शिराळा : तहसिलदार यांच्याकडे हात्तेगांव, खुजगांव, खिरवडे येथील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत बैठक झाली यावेळी उपस्थित सत्यजित देशमुख, तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल.

शिराळा (विनायक गायकवाड) : तालुक्यातील हात्तेगांव, खुजगाव, खिरवडे या गावाच्या शेतकऱ्यांच्या सात - बारा उताऱ्यामधील सर्व अडचणी सोडवा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी तहसिलदार गणेश शिंदे यांच्याकडे केली.

हात्तेगांव,खुजगांव, खिरवडे गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तहसिल कार्यालयात बैठक पार पडली. 

यावेळी तहसिलदार गणेश शिंदे यांच्याकडे या तिन्ही गावामधील शेतकऱ्यांच्या सात - बारा उतारावरील नोंदीची दुरुस्ती करणे, १५५ च्या खाली ऑनलाईन सात-बारा आद्यवत करणे, वारस नोंदी मधील अडचणी दूर करून मार्गी लावणे, यासाठी गावनिहाय कॅम्प घेण्यात यावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

सत्यजित देशमुख म्हणाले, या तिन्ही गावातील शेतकऱ्यांच्या अनेक दिवसापासून सदर मागण्या प्रलंबित राहिल्या आहे. वारंवार हे प्रश्न घेवून लोक याठिकाणी येत असतात. परंतु कामे मार्गी लागत नसल्याने लोक निराश होवून माघारी जात आहेत. सततचा पाठपुरावा करून ही हा प्रश्न प्रलंबित राहत असल्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत. तहसिलदार यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन तहसिलदार यांनी दिले आहे.

तहसिलदार गणेश शिंदे म्हणाले, तिन्ही गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मागण्या योग्य असून येत्या काळामध्ये सर्व मागण्या पूर्णत्वास आणून प्रशासन या लोकांना सर्व सहकार्य करेल. 

यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बाजीराव शेंडगे, माजी सरपंच नथुराम सावंत, शामराव सावंत, प्रकाश सावंत, धनाजी सावंत, बाळू सावंत, भीमराव सावंत, विक्रम सावंत, प्रकाश सावंत, हरी सावंत, सुरेश पवार, गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ,शेतकरी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments