Daily Mahasatta

Daily Mahasatta

लाॅकडाऊन धुडकावला, सांगली जिल्ह्यात शुक्रवार पासून सर्व उद्योग सुरु करणार

 

सर्वसामान्याना दिलासा देउन लॉकडाउन शिथील करण्यात यावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्ग ९ एप्रिल पासुन आपाले व्यापार धंदे सुरु करतील, असा इशारा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला देण्यात आला.

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे जनमानसात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे तात्काळ काही पावले उचलुन सर्वसामान्याना दिलासा देउन लॉकडाउन शिथील करण्यात यावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्ग ९ एप्रिल पासुन आपाले व्यापार धंदे सुरु करतील, असा इशारा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, विक्रेते, दुकानदार यांच्या विविध संघटनांनी प्रशासनाला दिला आहे. 

सांगली जिल्ह्यातील व्यापारी, लहान विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सलून चालक यांच्यासह विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून शासनाने लादलेल्या लाॅकडाऊनचा तीव्र विरोध केला. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत लाॅकडाऊन शिथील करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री आ. सुरेश खाडे, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री श्री उधदव ठाकरे यांनी जनतेला शनिवारी आणि रविवारी पुर्ण लॉकडाउन करण्याचे आणि सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सर्व नियम पाळुन सर्व व्यवहार चालु राहतील असे सांगितले होते. सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना या बद्दल सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा दिल होते. परंतु सध्या सांगली जिल्ह्यात ब्रेक द चेनच्या नावाखाली लॉकडाउनची सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये सर्व छोटे मोठे व्यवसाय बंद करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग तथा व्यावसायिक वर्ग या लॉकडाउन चा तीव्र विरोध करत आहेत. या लॉकडाउनमुळे श्रमीक कष्टकरी, मोलमजुरी करणारे तसेच छोटे व्यापारी यांचे हाल होत आहेत. गेले एक वर्ष अशाच प्रकारचे लॉकडाउन मुळे ते कर्जबाजारी होउन आर्थिक नुकसानी मध्ये गेलेले आहेत. प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बाजारपेठ बंद करण्याचे आदेश देऊन तमाम व्यापारी, फेरीवाले, भाजीवाले, उदयोजक, कामगार या सर्वांचा बोजवारा उडवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने चालु केला आहे

वास्तविक सर्व व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाले फेरीवाले, भाजीवाले हे प्रशासनाचे सर्व नियम पाळुून व्यापार करत आहेत आणि करतील. पण जिल्हा प्रशासनाने महिनाभर सगळेच व्यवहार बंद ठेवायला भाग पाडले आहे व पोलिस प्रशासनाने बळजबरीने व्यापार धंदा बंद करत आहेत. या कारवाईने परिस्थिती गंभीर होत आहे. रोजचे हातावरचे पोट असणारे कामगार, गरीब मजुर, छोटे व्यापारी यांची आर्थिक स्थिती आधीच नाजुक आहे. त्यात या लॉकडाउन मुळे जगणे आणखी कठीण झाले आहे. तरी आपण मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे , पालकमंत्री जयंतरावजी पाटील यांच्याशी व व्यापारी वर्गा बरोबर चर्चा करुन सध्या सुरु असलेले लॉकडाउन शिथील करावे व शनिवार व रविवारचे दोन दिवसाचे लॉकडाउन करावे. तसेच जिल्हाप्रशासनाने कोरोनाबाबतच्या सर्व नियमाचे पालन करून सोमवार ते शुक्रवार संपूर्ण बाजारपेठ सकाळी ७ ते रात्री ८ खुली करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने अध्यादेश काढावा.

आज गुरुवार दिनांक ८ एप्रिल २०२१ च्या व्यापारी वर्गाने पुकारलेल्या मोर्चाबाबत आपण गंभीर दखल घेऊन आजच लॉकडाऊन शिथील बाबत निर्णय घ्यावा अन्यथा जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्ग ९ एप्रिल पासुन आपापले व्यापार धंदे सुरु करतील. तरी आजच योग्य तो निर्णय घेउन लॉकडाउन शिथील करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments