Daily Mahasatta

Daily Mahasatta

पाण्यासाठी नागरिकांचे हाल नको : आमदार मानसिंगराव नाईक

शिराळा : येथील तहसील कार्यालयात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत बोलताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी तहसीलदार गणेश शिंदे व इतर मान्यवर.

शिराळा (विनायक गायकवाड) : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याविना कोणत्याही गावचे अथवा वाडी - वस्तीवरील नागरिकांचे हाल होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी तहसील कार्यालयात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस शिराळ्याचे प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, विराज नाईक प्रमुख उपस्थितीत होते.


आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा तालुका डोंगराळ व दुर्गम असल्याने उन्हाळ्यात येथील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. ही गावे विशेषतः डोंगरमाथ्यावरील आहेत. त्यामध्ये सोनवडे पैकी काळोखेवाडी व जळकेवाडी, रांजणवाडी, बेंगडेवाडी, शिंदेवाडी, चिंचेवाडी, खराळे, वाकाईवाडी, आरळा पैकी बेरडेवाडी व येसलेवाडी, खेड, बेलदारवाडी, गुंडगेवाडी-करुंगली या गावांचा सामावेश आहे. प्रशासनाने पाणी टंचाईचे नियोजन करताना पाण्याचा स्तोत्र उपलब्ध आहे तेथे कूपनलिका घ्याव्यात. ज्याठिकाणी विहिरींना पाणी उपलब्ध आहे त्या अधिग्रहण कराव्यात. जेथे कोणताच स्त्रोत उपलब्ध नाही तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा. जेणेकरून नागरिकांचे पाण्याविना हाल होणार नाही याची संपुर्णपणे खबरदारी घ्यावी.

प्रारंभी तहसीलदार गणेश शिंदे यांनी स्वागत करून टंचाई जाणवणारी गावांचा आढावा सांगितला. येथे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर सविस्तरपणे चर्चा केली. आमदार नाईक यांनी प्रत्येक गावाची ग्रामसेवकाकडून सद्य स्थितीची माहिती घेतली. त्यावरून कांही मार्गदर्शक सूचना दिल्या.

या बैठकीला गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पंचायत समितीचे उप अभियंता बाहुबली हुकिरे, सर्व गावचे ग्रामसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments