Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा नगरपंचायतीकडून मुदतबाह्य औषधांची फवारणी; शिवसेनेची कारवाईची मागणी

शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळा नगरपंचायतच्या वतीने सध्या करण्यात येत असलेल्या औषध फवारणी मधील औषधे मुदत संपलेली आहेत. नगरपंचायत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू ठेवला आहे. यामध्ये जबाबदार असणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत अशा मागणीचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख संतोष हिरुगडे यांनी शिराळा नायब तहसीलदार सचिन कोकाटे यांना दिले आहे.

शिवसेना व युवासेना शिराळा तालुका यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शिराळा शहरात सध्या डेंगू, मलेरिया सारख्या साथीचे रोग आणि त्याच बरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतच्या वतीने शहरात औषध फवारणी सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन नगरपंचायत कर्मचारी फवारात असलेल्या औषधांची आम्ही माहिती घेतली. यामध्ये असे दिसून आले की, डेलफॉग नावाचे जे औषध आहे त्याची मुदत २३ मार्च २०२१ रोजी संपलेली आहे.

सदर औषध फवारणी नगराध्यक्षा सौ. सुनिता निकम यांच्या प्रभाग क्रमांक ५ मध्येच सुरू होती. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरसेवक विश्वप्रताप नाईक केदार नलवडे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी फवारणी करत असलेल्या ठिकाणी स्वच्छता कामगार ठेकेदार व फवारणी कामगार ठेकेदार यांना बोलावून घेतले. नगराध्यक्षा सौ. निकम यांनी याबाबत ठेकेदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळ काढला. 

नगरपंचायत प्रशासन व सत्ताधारी यांनी जनतेच्या जीवा बरोबर चालवलेला हा खेळ त्वरित थांबवावा. या प्रकरणात जबाबदार व दोषी असलेल्यावरती तहसीलदार यांनी तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी आम्ही मागणी करत आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------
नजरचुकीने झालं...
औषध फवारणीसाठी आणलेली औषधे वेळोवेळी फवारणी करून संपवण्यात येतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या नजरचुकीने डेलफॉग नावाचे फक्त एक लिटरचेच औषध शिल्लक राहिले होते. कामगारांनी रात्रीच्या वेळी घाई गडबडी मध्ये सदर औषध बाटली फवारणी साठी घेतली होती.
- योगेश पाटील, मुख्याधिकारी

Post a Comment

0 Comments