Daily Mahasatta

Daily Mahasatta

वलखडात ' माझे गाव, माझी जबाबदारी ' उपक्रम सुरू


लाॅकडाऊन काळात सर्वजण शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले असताना वलखड ता. खानापूर येथील माऊली फौंडेशनने ' माझे गाव, माझी जबाबदारी ' हा उपक्रम राबवत गरिब गरजूंना अन्नधान्य, कपडे, औषधे मोफत देण्याची सुरवात केली आहे.
सांगली ( राजेंद्र काळे )
लाॅकडाऊनच्या काळात आपल्या गावातील एकही सामान्य माणूस अन्न, कपडे या मूलभूत गरजापासून वंचित राहू नये यासाठी वलखडच्या माऊली फौंडेशनने अनोखा निर्णय घेतला आहे. गावातील गरजू आणि वयस्कर लोकांना महिन्याला लागणारा किराणा माल आणि कपडे देण्यात येणार आहेत. मंगळवारी गावातील ११ कुटुंबाला मदत देऊन ' माझे गाव, माझी जबाबदारी ' या अनोख्या उपक्रमाची सुरवात केली आहे.

वलखड गावातील सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी माऊली फौंडेशन हा ग्रुप तयार केला आहे. ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गावात मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावावर ठेव पावती यासह अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. कोरोनाची भीषण परिस्थिती ओढवल्यानंतर गावातील गरिब कुटुंबातील लोकांची हालअपेष्टा सुरु झाली. याबाबतची माहिती समजताच ग्रुपच्या सदस्यांनी मोठा निर्णय घेतला.

लाॅकडाऊन काळात शासनाने गरिबांना मदत करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. वलखड गावात मात्र ' माझे गाव, माझी जबाबदारी ' असे म्हणत माऊली फौंडेशनच्या सदस्यांनी गावातील गोरगरीब गरजू लोकांचे पालकत्व स्वीकारले आहे. माऊली फौंडेशनने आजपासून वलखड गावामधील वयस्कर आणि गरजू लोकांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरु केले. गावातील अकरा कुटुंबाना मदत करत या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. यामध्ये त्यांना कपडे आणि किराणा साहित्य देण्यात आले.

या कुटुंबाना किराणा साहित्य प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहे. येणाऱ्या काही दिवसात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी वेळोवेळी करण्यात येणार असून त्यांना लागणारा गरजेनुसार शक्य तितका औषधोपचार करण्यात येणार आहे. वर्षामधून दोन वेळा कपडे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती माऊली फौंडेशनच्यावतीने देण्यात आली आहे. लाॅकडाऊन काळात शासनाच्या मदतीची वाट बघत न बसता माऊली फौंडेशनने राबविलेला ' माझे गाव, माझी जबाबदारी ' हा अनोखा उपक्रम राज्यात आदर्श ठरणार आहे. 

Post a Comment

0 Comments