Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा पालिकेची अतितातडीची सभा, घेतला मोठा निर्णय

विटा (प्रतिनिधी) : विटा शहर आणि खानापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी विटा नगरपरिषदेने आयटीआय काॅलेज जवळील शासकीय निवासी शाळेत ३८ बेडचे कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी दिली आहे. 

मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले, विटा शहर आणि परिसरातील कोव्हीड रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अतितातडीची सभा घेऊन विटा पालिकेच्यावतीने कोव्हीड सेंटर सुरु करावे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिला आहे. त्यानुसार नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक आज रविवार ता. १८ रोजी पार पडली. या बैठकीत आयटीआय काॅलेज जवळील शासकीय निवासी शाळेत विटा नगरपरिषद आणि डाॅ राधिका शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने ३८ बेडचे
कोव्हीड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये किमान २० बेड विटा शहरातील नागरिकांना आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

या रुग्णालयात शासकीय दराने रुग्णांना बील आकारण्यात येणार आहे, तसेच या बिलात नगरपरिषदेकडून १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचे कोव्हीड सेंटर सुरु करणारे विटा नगरपरिषद एकमेव आहे. सभा संपल्यानंतर तातडीने या कोव्हीड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. अवघ्या दोन तीन दिवसात हे कोव्हीड सेंटर रुग्णांना सुविधा देण्यास सज्ज होणार आहे. या कोव्हीड सेंटर मध्ये एमडी, एमबीबीएस डाॅक्टरांसह मेडिकल, लॅब अशा सर्व सुविधासह सुमारे ३० ते ३५ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. या कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असा विश्वास मुख्याधिकारी अतुल पाटील दैनिक महासत्ताशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई, माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी आपल्या स्टाफसह थेट शासकीय निवासी शाळेला भेट देऊन कोव्हीड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. या कोव्हीड सेंटरमुळे विटा शहर आणि परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments