Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलूस तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन समित्या अॅक्टीव मोडमध्ये येण्याची गरज

भिलवडी (खंडेराव मोरे) : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करून,कोरोना आपल्या गावांमध्ये येवू नये यासाठी ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाने पुन्हा एकदा अॅक्टीव मोडमध्ये येण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात दररोज सरासरी ५० हजारांहून अधिक कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आढळून येत आहे. सांगली जिल्ह्यात हि दररोज नऊशेच्या आसपास कोरोना बाधीत रूग्ण सापडत आहेत. पलूस तालुक्यात ही कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. पलूस तालुक्यात

आजतागायत एकण ३००४ कोरोना बाधीत रूग्ण सापडले असून, २६४३ रूग्णांनी आज अखेर कोरोनावर मात केली आहे. सध्या पलूस तालुक्यामध्ये २६६ सक्रिय कोरोना बाधीत रूग्ण आहेत. गेल्या वर्षी शंभरीपार रूग्ण संख्या गेलेल्या अंकलखोप,आमणापूर, भिलवडी व वसगडे यासारख्या गावांमध्ये पुन्हा एकदा नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या चोख नियोजनामुळे सदर गावांमध्ये सुरूवातीच्या काळात कोरोनाचा शिरकाव होवू शकला नव्हता. 

त्याचपद्धतीच्या नियोजनाची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन व आरोग्य विभागावर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने गावातील परिस्थिती पाहून योग्य ते नियोजन करून कोरोना बाधीत रूग्णांची संख्या वाढू नये याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. आपत्ती व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाने समन्वयाने काम केल्यास विदारक होत चाललेल्या या कोरोनाच्या महामारीवर नक्कीच मात करता येईल.

Post a Comment

0 Comments