Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा स्मशानभूमीतील कोव्हीड 'योद्धांना ' कौतुकाची थाप

विटा (प्रतिनिधी) : विटा शहर आणि परिसरात कोरोनाने निधन झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर विटा कराड रस्त्यावरील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. जीवाभावाचे नातेवाईक देखील कोरोनाच्या भितीमुळे अंत्यसंस्काराच्या वेळी जवळ फिरकत नसताना विटा पालिकेच्या स्मशानभूमीतील कोव्हीड योद्धे मात्र जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. आज पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी या कोव्हीड योद्धांची स्मशानभूमीत जाऊन विचारपूस केली आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 

गेल्या वर्षभरात कोरोनाने बळी गेलेल्या सुमारे पाऊणे दोनशे जणांवर विटा नगरपरिषदेच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आता तरी मृत्यूचा आकडा वाढल्याने दररोज पाच सात मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. विटा पालिकेतील आरोग्य विभागाने या कामी स्मशानभूमीतील कोव्हीड योद्धांच्या पाच पाच जणांच्या दोन टीम बनवल्या आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्या विटा शहर आणि परिसरातील रुग्णांच्या मृतदेहावर इथेच अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व टीम पीपीई कीट, सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करत अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडत आहेत. गेल्या वर्षभरापासून सातत्याने कोरोना चे दडपण झुगारून देत आपल्या घरापासून दूर राहून ही टीम कार्य करत आहे. आज मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी थेट स्मशानभूमी गाठून या कोव्हीड योद्धाची आस्थेवाईक विचारपूस केली. सर्वांना काळजी घेण्यास सांगितले आणि पालिका प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. स्वतः मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी स्मशानभूमीत येऊन कौतुक केल्याने हे खरेखुरे कोव्हीड योद्धे भारावून गेले होते. 
-------------------------------------
विटा पालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार...
कोरोनाने निधन झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करताना पालिका कोणतेही शुल्क आकरत नाही. स्मशानभूमीत काम करणार्या सर्व कर्मचार्याच्या आरोग्याची काळजी घेत आहोत. तरी नागरिकांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

- अतुल पाटील, मुख्याधिकारी, विटा नगरपरिषद.

Post a Comment

0 Comments