Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळ्यात कोरोनाचा कहर, प्रशासन अलर्ट

शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळा तालुक्यात आज ७६ लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कमी-जास्त होणारी रुग्णांची संख्या निश्चितच चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पाटील यांच्याशी संबंधित सर्व यंत्रणा, अधिकारी आणि कर्मचारी कोरणाचा फैलाव रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिराळा शहरामध्ये मुख्याधिकारी योगेश पाटील यांचेसह नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक सतर्कपणे समन्वयातून काम करत आहेत. त्यांच्या मदतीला काही सामाजिक सेवा संस्था देखील एकत्र आल्या आहेत. शहरातील डेंगू आणि मलेरियाची साथ आटोक्यात आली आहे. साथीचे रोग होऊ नयेत म्हणून नगरपंचायतच्या वतीने सोडियम हायप्रोक्लोराईड आणि त्याचबरोबर विविध औषधांच्या फवारण्या सुरू आहेत.

आज मनदूर मध्ये ११ रुग्ण, मिरुखेवाडी मध्ये १० रुग्ण, औंढी मध्ये ६ रुग्ण, कोकरूड व रेड मध्ये प्रत्येकी ५ रुग्ण, माळेवाडी मध्ये ४ रुग्ण, चिखली, कांदे, सागाव, शिराळा, शिरशी या गावात प्रत्येकी ३ रुग्ण, बिळाशी, काळुंद्रे, पणुंब्रे तर्फ वारूण मध्ये प्रत्येकी २ रुग्ण तर आंबेवाडी, बेलेवाडी, भागाईवाडी, कोंडाईवाडी, लादेवाडी, शिरसटवाडी, बिऊर, चरण, गिरजवडे, मांगले, मेनी, उपवळे, वाकुर्डे बुद्रुक, येळापुर पैकी चव्हाणवाडी या गावांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये. शासकीय नियमांचे पालन करत लसीकरण करून घ्यावे. असे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. शिराळा पोलीस स्टेशन व कोकरूड पोलीस स्टेशन हे तालुक्यातील दोन्ही पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी शासकीय नियमांचे पालन होते की नाही याचा आढावा घेत नियम मोडणाऱ्यावरती कारवाई करत आहेत.

Post a Comment

0 Comments