Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा तालुक्यात बिबट्याचा हल्ला, नागरिकांत दहशतीचे वातावरण

शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळा तालुक्यातील निगडी येथील शेतकरी ज्ञानदेव साळुंखे यांच्या गाभण शेळीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळी जागीच गतप्राण झाली. वन विभागाच्यावतीने पंचनामा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत वनविभाग व घटनास्थळावरून समजलेली हकीकत अशी, निगडी येथील शेतकरी ज्ञानदेव साळुंखे यांचे पाडळीवाडी रस्त्यालगत शेतात घर आहे. घराच्या मागील बाजूला असलेल्या जनावरांच्या गोठ्या शेजारी त्यांनी बैलगाडीला शेळी बांधली होती. मात्र काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदा साळुंखे गाईची धार काढत असताना अचानकपणे शेळीचा आवाज यायचा बंद झाला. म्हणून त्यांनी पाहिले असता बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे दिसून आले. बिबट्याने शेळीच्या मानेला आपल्या जबड्यात घट्ट पकडून ओढत नेत असल्याचे त्यांनी पाहिले. तात्काळ धाडसाने त्यांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी दगड आणि काठीने त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली मात्र या हल्यात शेळी जाग्यावरच गतप्राण झाली.

यावेळी वनपाल चंद्रकांत देशमुख, खुजगाव विभागाच्या वनरक्षक देवकी ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments