Daily Mahasatta

Daily Mahasatta

लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता काॅल सेवा

सांगली (प्रतिनिधी) : महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सांगली महापालिकेकडून कॉल सेवा सुरू केली जाणार आहे. लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून सर्व आरोग्य केंद्राना आवश्यक कर्मचारी देणार असल्याचेही महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर उपाययोजना बाबत चर्चा करण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिका सभागृहात मनपा अधिकारी, पदाधिकारी नगरसेवक तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेऊन मनपाकडून सुरू असणाऱ्या उपाय योजनबाबत आढावा घेतला. या बैठकीस स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती महापौर सूर्यवंशी यांनी घेतली. याचबरोबर आरोग्यकेंद्राना आणखीन काय सुविधा लागणार आहेत याबाबतही सूचना घेतल्या. अनेक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्याठिकाणी कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून सर्व आरोग्य केंद्रांना अधिकचा स्टाफ देण्याबाबत नियोजन केले जाईल. 

याचबरोबर तिन्ही शहरात आता प्रभाग निहाय औषध फवारणीसाठी एकच नियमित फवारणी गाडी ठेवली जाईल. ज्यामुळे त्या त्या भागातील सदस्यांना औषध फवारणीबाबत त्याचा उपयोग होईल. याचबरोबर दोन दिवसातून एकदा प्रभागाचे सहायक आयुक्त, समन्वयक आणि स्थानिक नगरसेवक यांच्यात एक बैठक घेतली जावी. जेणेकरून प्रभागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाबाबत दक्षता आणि अन्य उपपयोजना करण्यास मदत होईल. कोरोनाच्या या संकटात सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनाला साथ द्यावी आणि सर्वानी मिळून या संकटाचा सामना करू असे आवाहनही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

कोरोना लसीकरणासाठी आता कॉल सर्व्हिस : महापौर सूर्यवंशी
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर होणारी संभाव्य गर्दी पाहता आता लसीकरणासाठी कॉल सर्व्हिस सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये संबंधित आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध लसीनुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना संपर्क साधून बोलावून लसीकरण करून घेणेचे आहे. या मुळे लसीकरणासाठी थांबून राहिलेल्या लोकांना कॉल सेंटरमुळे फायदा होईल आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताणही कमी होईल याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Post a Comment

0 Comments