Daily Mahasatta

Daily Mahasatta

लेंगरेत निकृष्ट बंधारा बांधला, ठेकेदारावर कारवाई करण्याची मनसेची मागणीविटा (प्रतिनिधी) : लेंगरे येथील बोबडेवाडीच्या ओढ्या वरती काही वर्षांपूर्वी सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मनसे चे तालुकाध्यक्ष साजीद आगा यांनी केली आहे. 

प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, बोबडेवाडी येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, ह्यासाठी ओढ्यावरती या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. सदरचा बंधारा हा ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचा बांधल्याचे दिसून येते. या बंधाऱ्याचे काम करताना यामध्ये सिमेंटाचा वापरही कमी करण्यात आलेला आहे. 

या बंधाऱ्या विषयी कृषी खात्याकडे माहिती मागवल्यास हा बंधारा ग्रामपंचायतीकडे आहे व ग्रामपंचायतीकडे माहिती मागवल्यास कृषी खात्याकडे आहे असे सांगण्यात येते. या बंधाऱ्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तरी या गावच्या आसपास बांधलेल्या सर्व बंधाऱ्याची तपासणी होऊन संबंधित ठेकेदार याच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा..तसेच या बंधाऱ्यासाठी निरक्षण अधिकारी नेमण्यात आला होता त्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी. 

सद्य:स्थितीत असलेल्या बंधाऱ्याच्या बांधकामाचा दर्जा लक्षात घेतला तर बंधारा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या कामाची चौकशी करून लवकरात लवकर संबंधित ठेकेदारावर व या कामासाठी नेमणूक केलेल्या निरक्षण अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना आपल्या कार्यालयासमोर आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments