Daily Mahasatta

Daily Mahasatta

सीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठवली १० लाखांची पुस्तके, वाळवा तालुक्यात अनोखा उपक्रम

इस्लामपूर, (सूर्यकांत शिंदे) : सीमेवर कार्यरत असणाऱ्या जवानांना पुस्तके देण्याच्या वाचन चळवळ उपक्रमांतर्गत वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावातील जवान प्रतिक जयवंत पाटील व सोमेश संजय इंगवले या दोघांना मराठी पुस्तकांचे संच भेट देण्यात आले. डॉ. माजी सैनिक संघटना गोटखिंडी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

क्रेडाईचे अध्यक्ष गणेश पाटील, दत्तात्रय माने तसेच माणुसकीचे नाते ग्रुपच्या सदस्य व जायंट्स ग्रुपच्या पदाधिकारी मीनल दीक्षित यांनी या उपक्रमाला पुस्तके दिली होती. वाचन चळवळीचे प्रवर्तक डॉ. प्रा. संजय थोरात यांनी उपक्रमामागची भूमिका मांडली. आजपर्यंत चारशेहुन अधिक जवानांच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर विविध ठिकाणी सुमारे दहा लाख रुपये किमतीची पुस्तके पाठवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ विजय गायकवाड, सूर्यकांत शिंदे, माजी सैनिक संघटनेचे अधिकारी व गावातील ज्येष्ठ नागरिक सामील झाले होते. डॉ. दीपक स्वामी यांनी वाचन चळवळीचे गीत सादर केले. माजी सैनिक बाजीराव माळी व बाळकृष्ण सावंत यांनी उपक्रमाचे कौतुक केले. धनंजय थोरात म्हणाले, "वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो. जवान कार्यरत असणाऱ्या ठिकाणी मराठी पुस्तके नसतात याची जाणीव ठेवून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे." जयवंत पाटील व पी. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय गायकवाड, मिलिंद थोरात, सूर्यकांत शिंदे, धर्मवीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भीमराव मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments