Daily Mahasatta

Daily Mahasatta

कामगार आणि महिलांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे : आ. गाडगीळ

सांगली (प्रतिनिधी) : “घटनेचे शिल्पकार ही भारतरत्न बाबासाहेबांची ओळख महत्त्वाची आहेच, पण केंद्रीय मंत्री असताना त्यांनी कामगारांचे कामाचे तास निश्चित केले. त्यापूर्वी मालक, कारखानदार, जेवढा वेळ राबवून घेईल तेवढा वेळ कामगारांना राबावे लागत होते. तसेच स्त्रियांना मतदानाचा अधिकार देतानाच त्यांना विशिष्ट प्रसंगी रजा ही द्याव्यात, असा कायदा भारतरत्न बाबासाहेबांनी केला. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार देवून त्यांनी लोकशाहीला खरा अर्थ प्राप्त करून दिलाच. पण कामगार आणि महिला वर्गासाठी त्यांनी केलेल्या कायद्याबद्दल त्या वर्गाने कायम बाबासाहेबांचे ऋणी राहिले पाहिजे”. असे विचार आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यावर ते बोलत होते. अनेक राष्ट्रांच्या राज्य घटनांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती, परंपरा यात सामावणारी राज्यघटना आपल्या देशासाठी बनवली. जगातल्या उत्कृष्ट राज्यघटनांमध्ये आपल्या राज्यघटनेचा समावेश होतो, याचे सर्वस्वी श्रेय बाबासाहेबांनाच जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक, प्रकांड  पंडित, शिक्षणतज्ञ, गोर गरीब जनतेसाठी आंदोलन करणारे म्हणून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. खऱ्या अर्थाने ते भारताचे रत्न होते” असेही आ. गाडगीळ म्हणाले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय कुलकर्णी, नगरसेविका सविताताई मदने, डॉ. भालचंद्र साठे, श्रीकांत तात्या शिंदे, अजयकुमार वाले, राहुल जाधव, गौस पठाण, गणपती साळुंखे, आबा जाधव, अमोल कणसे, रवींद्र जाधव, गणेश कांबळे, अमित भोसले, प्रशांत मोरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments