Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत लाॅकडाऊनच्या विरोधात गुरुवारी व्यापारी, विक्रेत्यांचा मोर्चा

सांगली (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना व त्यांच्या कामगारांना जगणे अवघड होत आहे. त्यांना पाठिंबा म्हणून गुरुवारी सकाळी १० वा. विश्रामबाग चौकातून व्यापारी, हातगाडीवाले, हॉटेल व्यावसायिक व इतर सर्वाना बरोबर घेऊन प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाही दिली तरी मोर्चा काढला जाईल. निर्णय न झाल्यास शुक्रवारी आम्ही दुकाने उघडणारच असा इशारा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिला.

आ. गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याबैठकीचा उद्देश अतुल माने यांनी विशद केला. स्वागत व प्रास्ताविक अश्रफ वांकर यांनी केले. या बैठकीत सर्वानी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मिरज सराफ संघटनेचे सुनील चिपलकट्टी म्हणाले,'एक्साईज च्यावेळी आम्ही ४४ दिवस बंद पाळला होता. गतवर्षी कोरोनामुळे पाडव्यासारखा मोठा सण वाया गेला होता. आताही तीच परिस्थिती आहे. ग्राहक समोर आहेत. त्यांना द्यायच्या वस्तू तयार आहेत. लॉकडाउनमुळे यावर्षीचा पाडवाही वाया जाणार आहे. असल्या परिस्थितीमुळे कामगार काम सोडून चाललेत. फळमार्केटचे अनिल आलदर यांनी आम्हाला रस्त्यावर बसून फळे विकण्याची परवानगी असेल तरच आम्ही फळमार्केट सुरु ठेवू असे सांगितले. 

जिम संघटनेच्या इनायत तेरदाळकर यांनीही जिमचालकांना न्याय द्यावा असे सांगितले. सुभाष सारडा यांनी, 'आपले नेतृत्व करणारे कोणीच नाहीत. पोलिसांनी दाब दाखवून दुकाने बंद करायला लावली. शासन व व्यापारी यांनी समन्वय साधावा. हे सर्व करताना कोविड पासून संरक्षणही झाले पाहिजे. गणेशमार्केट च्या गणेश कोडते म्हणाले ,'महापुरात गणेश मार्केट्मधील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेने आम्हाला कोणतेही कर माफ केले नाहीत. दुकानात माल भरण्यासाठी मोठी कर्जे घेतली आहेत. बँकांचा वसुलीसाठी तगादा सुरु झालाय. उपाशी मरण्याची वेळ आली आहे.

फास्टफूड संघटनेचे सुरेश टेंगले म्हणाले, 'शासनाने अभ्यास न करता नियमावली तयार केली आहे. विरोधक म्हणून दादा तुम्ही आता राजकारण केलेच पाहिजे. आगामी काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. बंदमुळे कोणताही खर्च थांबला नाही. लॉकडाउनचे भूत मानगुटीवरून उतरले पाहिजे. शासनावरून विश्वास उडालाय. नाभिक संघटनेचे संतोष खंडागळे म्हणाले, 'नाभिक समाजामुळे कोणीही कोरोनाबाधित होत नाही. व्यापाऱयांच्यानंतर आमच्यावर हल्ला होतो. आमची अवस्था अत्यंत वाईट आहे असे सांगितले. वाहतूक संघटनेचे मल्लिकार्जुन मजगे म्हणले,' आमचा व्यवसाय आता सुरळीत सुरु होत असताना आता पुन्हा लॉकडाउनचे भूत मानगुटीवर बसले आहे. पानपट्टी संघटनेचे खजिनदार राजू पागे म्हणाले,' २०१३ पासून आमच्यावर शासनाने आक्रमण केले आहे. गेली ९ वर्षे आम्ही सरकारसोबत भांडतोय. आज अनेक गोष्टी महागल्या आहेत. शासनाने आम्हाला भरडून काढलय. आमच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी आम्ही आमचे व्यवसाय बंद करू. जिल्ह्यात १० ते १२ हजार पानदुकानदार आहेत. ३२८ कलमाखाली पानपट्टीवाल्याला आत टाकत आहेत. असे होत असेलतर आमच्या कुटुंबांनी आत्महत्या करायची काय. अत्यावश्यक सेवा म्हणजे काय हे त्यांना माहित आहे काय.

फास्टफूड विक्रेते अशोक कोळी यांनी,' पार्सलसेवेला परवानगी द्यावी अशी मागणी केली. मिरज व्यापारी संघटनेचे विराज कोकणे म्हणाले, 'गतवर्षी अचानकपणे लॉकडाउन झाले. त्यावेळी कोरोना या आजाराबाबत फारशी माहिती नव्हती. परंतु आता व्यापारी पूर्ण काळजी घेत आहेत. अनेक व्यापाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शनिवार व रविवारचा लॉकडाउन आम्हाला मान्य आहे. पण ५ दिवसांचा नाही. गुरुवारपासून आम्ही आमची दुकाने उघडणार मग काय व्हायचंय ते होऊ दे. आता आम्ही थांबणार नाही. सामान्य व्यापारी संपत चाललाय. व्यापारी संघटनेचे अतुल शहा म्हणाले,' अविचारी शासनाचा हा अविचारी निर्णय आहे. शूटिंग, रेल्वे,बस सुरु आहेत. तेथे गर्दी नसते काय. आदेश काढताना विचार करून काढायला पाहिजे होता. गर्दीची ठिकाणे बंद करा. शासनाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. हा आदेश तातडीने रद्द करावा. युवानेते पै. पृथ्वीराज पवार म्हणाले,; जीआर चा चुकीचा अर्थ लावून प्रशासनाने कारवाई केली आहे. खरी परिस्थिती काय आहे हेच माहित नाही. शासनाने निर्णय न बदलल्यास उद्रेक होईल. सांगली रस्त्यावर उतरल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरतो हा इतिहास आहे.

आमदार सुधीरदादा गाडगीळ पुढे म्हणाले,'प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतो. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याशी चर्चा करताना केवळ शनिवार व रविवारच्या बंदीबाबत चर्चा केली होती. जीआर मध्ये लॉकडाउन हा शब्द न वापरता सर्व बंद असा शब्दप्रयोग केला आहे. वीजबिलात कोणत्याही प्रकारची माफी दिली नाही. सूट देतो म्हणून फसवणूक केली. अनेकांची वीज तोडली आहे. यातून बाहेर पाडण्यासाठी आता रस्त्यावर उतरावेच लागेल. यामागणीसाठी गुरुवारी मोर्चा काढू. बैठक घ्यायला भाग पाडू. निर्णय न झाल्यास शुक्रवारपासून व्यापारी आपली दुकाने उघडतील असे सांगितले. दीपक माने यांनी हा विरोध सांगलीकरांचा आहे हे दाखवून द्या असे सांगितले. यावेळी अरुण दांडेकर, धीरज सूर्यवंशी, संजय यमगर. रघुनाथ सरगर, दरिबा बंडगर, सुजित राऊत, अश्रफ वांकर, अतुल माने यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments