Daily Mahasatta

Daily Mahasatta

राजारामबापू पाटील सहकारी बँकेला ४०. ५७ कोटींचा नफा


राजारामबापू पाटील सहकारी बँकेला ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ४०.५७ कोटींचा ढोबळ नफा
इस्लामपूर (हैबत पाटील)
राजारामबापू पाटील सहकारी बँकेला ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ४०.५७ कोटींचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन शामराव पाटील (आण्णा) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शामराव पाटील म्हणाले, गत वर्षाच्या काळात कोरोना सारख्या संकटाला सामोरे जात, राजाराम बापू बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के राहिला आहे . बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर असून एकूण ४६ शाखा मधून बँकेचे कार्य चालु आहे. बँकेला जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. सामान्य नागरिक आमचा केंद्रबिंदू आहे. कमी वेळात चांगल्या सुविधा देताना नव्या बदलाचा स्वीकार करत आहोत. एटीएम , कॅशलेस , मोबाईल बँकिंग, पेटीएम सुविधा ग्राहक वापरत आहेत. त्यामुळे नवे आव्हान स्वीकारून कार्यरत आहोत. आम्ही कॅश डिपॉझिट, पासबुक प्रिंटींग मशीन बसवल्या आहेत. शैक्षणिक, वाहन , गृह ,शेती, घरदुरुस्ती आदी कर्ज उपलब्ध करून दिली आहेत. डॉक्टरांच्या साठी मशिनरी, रुग्णवाहिका खरेदीसाठी व्याज दर माफक आहेत."

ते म्हणाले , " बँकेने गेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा १४ कोटी ८ लाख रुपयांचा मिळवला आहे. इन्कमटॅक्स म्हणून ४ कोटी ४५ लाख रुपये भरले आहेत. बँकेत २१६६.७५ कोटीच्या ठेवी आहेत. ठेव कर्जाचा रेशो ६६.५६ इतका आहे.१४४१.६६ कोटींचे कर्ज वितरण केले आहे. ढोबळ एनपीए शून्य टक्के आहे. गेली अनेक वर्षे निव्वळ एनपीए शून्य ठेवण्यात यश मिळवले आहे. ढोबळ नफ्यातून बुडीत व संशयीत निधी म्हणून २० कोटींची तरतूद केली आहे. ३७२ कर्मचारी आहेत.बँकेच्या प्रती कर्मचारी व्यवसाय ९ कोटी ७० लाख रुपये आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे बँक प्रगतीपथावर आहे. कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जात आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना २० ते ३२ टक्के पर्यंत बोनस देतो."

ते म्हणाले , " देशात राष्ट्रीयकृत बँकेसह अनेक वित्तीय संस्था अडचणीत आहेत. चांगले कर्जदार नाहीत. ठेवी घेण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. चांगले कर्जदार मिळणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेने २०२३ पर्यत को. ऑपरेटिव्ही बँकेत २५ लाखांच्या आतील कर्जे जास्तीत जास्त वितरित केली पाहिजेत असे धोरण तयार केले आहे. म्हणून आम्ही छोटी कर्जे वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. अवघ्या ९ टक्के व्याजदरात आम्ही कर्ज पुरवठा करणार आहोत. छोट्या गरजू लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या राजारामबापू बँकेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक शिस्त , व्यावसायिक व्यवस्थापन, उत्तम दर्जाची ग्राहक सेवा दिल्या जात आहेत. यावेळी उपाध्यक्ष जनार्दन पाटील, कार्यकारी संचालक आर एस जाखले, संचालक ,संजय पाटील , डॉ. प्रकाश पाटील, माणिक पाटील, सुभाष सूर्यवंशी, धनाजी पाटील, डॉ. दीपा देशपांडे, जगन्नाथ स्वामी, नामदेव मोहिते, संभाजी पाटील, माजी संचालक बाबुराव हुबाले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments