Daily Mahasatta

Daily Mahasatta

सरकारने मोफत लस पुरवठा करावा : पृथ्वीराज पाटील यांची मागणी

सांगली, (प्रतिनिधी) : कोरोना काळात राजकारण न आणता केंद्र सरकारने कोविड लसीचा मोफत पुरवठा करावा अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.

काँग्रेसच्यावतीने कोरोना मदत व सहाय्य केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, त्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज आँनलाईन बैठक घेतली. त्यावेळी श्री. पृथ्वीराज पाटील यांनी हा मुद्दा मांडला. 

केंद्र सरकारने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा करताना रुग्ण आणि नातेवाईकांना वेठीस धरू नये, दुजाभाव करू नये, तसेच अठरा वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस पुरवठा करावा अशी मागणी श्री. पाटील यांनी केली. 

सांगलीतील काँग्रेसच्या मदत व साहाय्य केंद्रात आत्तापर्यंत १११ लोकांना बेड मिळवून देण्यात आले, तसेच ३० व्हेंटिलेटर आणि ५२ जणांना रेमडेसिवीर आणि एका रुग्णाला प्लाजमा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात आली. या केंद्राचा आत्तापर्यंत २१० लोकांना फायदा झाला असेही पाटील यांनी सांगितले.


वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सांगलीतील वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट तातडीने सुरु करावा तसेच जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठाही अधिक प्रमाणात करावा अशी मागणीही त्यांनी केली.

याशिवाय प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी मोफत धान्य १ मे पासून दिले जाणार आहे, परंतू त्याचबरोबर आधी दिले जात होते त्याप्रमाणे दोन रुपये किलो प्रमाणे गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळही दिले जावे. तसेच केसरी शिधापत्रिकाधारकांना गेल्या वर्षीप्रमाणे दहा रुपये किलो दराने गहू आणि आणि बारा रुपये किलो दराने तांदूळ द्यावा अशी मागणी श्री. पाटील यांनी केली.

जे घटक शासनाच्या कोरोना मदतीच्या कक्षात आले नाहीत, अशा सलून व्यावसायिक, गटई कामगार आणि धोबी यांनाही आर्थिक मदत मिळावी, परमिटधारक रिक्षाचालकांबरोबरच परमिट नसलेल्या रिक्षाचालकांनाही आर्थिक मदत द्यावी, तसेच ज्यांच्याकडे छोट्या व्यवसायासाठीचा डी फॉर्म नोंदणी केला नाही, त्यांनाही आर्थिक मदत मिळावी अशी मागणीही श्री. पाटील यांनी यावेळी केली.
----------------

Post a Comment

0 Comments