Daily Mahasatta

Daily Mahasatta

होम आयसोलेशन ठरतंय कोरोना प्रसार केंद्र

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांचे नातेवाईक, शेजारी हे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू असताना होम आयसोलेशन मध्ये असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक कसलीही दक्षता घेताना दिसत नाहीत. उलट जणू काही झालेच नाही या अविर्भावात समाजात वावरताना दिसत आहेत. या त्यांच्या बेदरकार, बेजबाबदार राहण्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे, हे सध्याचे विदारक वास्तव आहे.

कोरोनाचा सगळीकडे उद्रेक होऊ लागला आहे. शहरे, गाव, वाड्या खेड्यावर कोरोना धुडगूस घालताना दिसत आहे. सगळीकडे परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र होम आयसोलेशन मध्ये असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक प्रशासनाच्या नियमांना तिलांजली देत अगदी बिनधास्त समाजात वावरत आहेत. याचा परिणाम कोरोनाचा फैलाव, प्रदूर्भाव वाढतच आहे. सगळीकडे परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. त्यातच लसीचा तुटवढा आहे. लस घेण्यासाठी गेलेले नागिरक लस न घेताच रिकामे हाताने परतत आहेत.

शासन , प्रशासनाने आपली यंत्रणा युद्धपातळीवर लावली आहे. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहेत. लोकांना याविषयी सतर्क राहण्यासाठी आवाहनही करण्यात येत आहे. परंतु काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना याचे भान नसल्यासारखे वागत आहेत. राजरोसपणे मित्र, शेजारी, समाजात अशा ठिकाणी उठ-बस करत आहेत.

होम आयसोलेशन केलेल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता कडक निर्बंध ठेवण्याची गरज आहे. प्रतिबंधात्मक फलक लावलेली ठिकाणे नजरेखाली ठेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलून कारवाया करून यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लॉकडाऊन करत एकीकडे शासन, प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे, लोकही या नियमांचे पालन करत विनाकारण घराबाहेर न पडता घरीच राहून नियमांचे पालन करत आहेत .तर दुसरीकडे ग्रामीण भागात होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण सर्व जबाबदाऱ्या जुगारून मोकाट वावरताना दिसत आहेत ही परिस्थिती आहे.
---------------------------------------- 
जनजागृती गरजेची...
होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांनाच्या घरी स्थानिक प्रशासनाने जनजागृती करण्याची गरज आहे. सध्या कोरोना रुग्ण कोण आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत याच्या महितीपासून नागरिक अनभिज्ञ असतात. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली तर ते त्यांच्यापासुन सावधगिरी बाळगतील आणि याचा फैलाव काही प्रमाणात का होईना रोखता येईल.

Post a Comment

0 Comments