Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठनाका - इस्लामपूर मार्ग बनला मृत्यूचा सापळा

: सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

शिराळा (विनायक गायकवाड)

पेठनाका - इस्लामपूर मार्गावर कापूरवाडी ते शिराळा नाका या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दररोज अपघातांची मालिका सुरू आहे.

याबाबत सदर मार्गावर प्रवास करणाऱ्या स्थानिक प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. पेठ इस्लामपूर हा मार्ग नेहमी वर्दळीचा आणि मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा मार्ग आहे. पावसाळ्यानंतर या मार्गावर छोटे छोटे खड्डे पडायला सुरुवात झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष दिले असते तर आजची भयावह परिस्थिती निर्माण झाली नसती. मात्र नेहमीसारखी गांधरीची भूमिका घेऊन आपले काम दुसऱ्यावर ढकलणाऱ्या या विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर आज मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत.

यातून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते आहेच. याउलट या मोठ्या मोठ्या खड्यांमुळे दररोज अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोठ्या खड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. तर काही प्रवाश्यांना या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्यांमुळें आपला प्राण गमवावा लागला आहे.

या सगळ्याचे काहीच सोयर सुतक नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास काही पोलिस कर्मचारी यांनी संपर्क साधला असता त्यांना या विभागाने नेहमीप्रमाणे कागदोपत्री संदर्भ देत उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केला असल्याचा प्रसंग नुकताच घडला आहे. सदरचा मार्ग सध्या जरी केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असला तरी सामजिक भान राखत या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्यासाठी स्थानिक पातळीवर या विभागाने औदार्य दाखवणे गरजेचे आहे. इस्लामपूर बांधकाम विभागाने असंवेदनशील न बनता, प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवून सध्या खड्डे मुजवण्याचे काम तरी करावे अशी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माफक अपेक्षा आहे.

सदरचा मार्ग रुंदीकरण होऊन रस्ता मोठा होईल तो भाग वेगळा असला तरी सध्या खड्डे मुजविने गरजेचे आहे. जेणेकरून प्रवाशांचे होणारे हाल थांबतील आणि विनाकारण जाणारे जीव वाचतील. त्यामुळे संबंधित विभागाने समन्वयाची भूमिका घेऊन पेठ नाका ते इस्लामपूर मार्गावर पडलेले मोठे खड्डे मुजवून प्रवाशांना वाहतुकीस रस्ता चांगला करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments