Daily Mahasatta

Daily Mahasatta

दक्षिण भारत जैन सभेचा 123 वा वर्धापन दिन साजरा

सांगली (प्रतिनिधी)
: संपूर्ण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील जैन समाजाची प्रातिनिधीक संस्था असलेल्या दक्षिण भारत जैन सभेचा 123 वा वर्धापन दिन सोहळा सभेच्या कार्यालयात संपन्न झाला. सभेच्या स्थापनेबरोबरच सभेची महिला शाखा म्हणून जैन महिला परिषदेचीही स्थापना करण्यात आली होती. सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील, चेअरमन श्री. रावसाहेब पाटील व महिला परिषदेच्या चेअरमन सौ. स्वरूपा पाटील (यड्रावकर) यांच्या हस्ते सभेचे अध्वर्यु स्व. दिवाणबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे त्याचबरोबर जैन महिला परिषदेच्या पहिल्या चेअरमन गोदूबाई उपाध्ये यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी कोरोना कालावधी असल्याने गेल्यावर्षी आणि यावर्षीही आपण मोठ्याप्रमाणात वर्धापन दिन सोहळा संपन्न करू शकलो नाही परंतु या कालावधीत कोरोना संक्रमितांसाठी सभेने धान्य-भोजन कीट, कोरोना हॉस्पिटल निर्माण करून सक्रिय योगदान दिले आहे. या विषम परिस्थिती असतानाही सभा आणि शाखांचे विविध समाजोपयोगी उपक्रम, वीर सेवा दलाने कोरोणा कालावधीत केलेला रक्तदान शिबीर घेवून सुमारे तीन हजार पाचशे विक्रमी रक्तबॅगेचे संकलन केले आहे.

सांगली बोर्डिंग, श्रीमतीबाई कळंत्रे जैन श्राविकाश्रम या शाखांचे नूतन इमारत बांधकाम, बेळगाव येथे प्रथमाचार्य शांतिसागर स्मारकाचे बांधकाम आणि या बांधकासाठी समाजातून देणगीदारांचे सहकार्य मिळत आहे. सभेने जीवनसंजीवनी फंडही 1 कोटी रू. करणेचा संकल्प सोडला आहे. संस्कार, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीनुसार कार्यरत असलेल्या सभेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील (दादा) यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आपण येथून पुढेही जोमाने कार्यरत राहूया, असे आवाहन केले.

सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी सभेने संकल्पित केलेल्या सांस्कृतिक भवनाचा शुभारंभ यावर्षी करण्याचे सूतोवाच केले. जैन महिला परिषदेच्या चेअरमन सौ. स्वरूपा पाटील (यड्रावकर) यांनी अल्पसंख्यांक जैन समाजाची प्रतिनिधीक संस्था असलेल्या सभेने तत्कालीन विषम परिस्थितीत सभेबरोबर जैन महिला परिषदेचीही स्थापना करून महिलांच्या कर्तृत्वालाही संधी दिली होती. हा पुरोगामी विचार आजही सभेने जोपासला आहे. समाज अल्पसंख्याक असला तरी सुसंस्कारीत अशा आपल्या समाजात विवाह समस्या जोर धरू पहात आहे.

त्याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्याच्या निवारण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्नशील राहूया असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास सभेचे सहखजिनदार सर्वश्री पा. पा. पाटील, विभागीय उपाध्यक्ष प्रशांत पाटील (मजलेकर), ट्रस्टी पोपटलाल डोर्ले, महामंत्री शांतिनाथ नंदगावे, वीर सेवा दलाचे सेक्रेटरी एन. जे. पाटील, पदवीधर संघटनेचे चेअरमन प्रा. ए. ए. मुडलगी, प्रा. एस. डी. आकोळे, प्रा. बी. बी. शेंडगे, बा. भु. पाटील ग्रंथ प्रकाशनाचे सेक्रेटरी गजकुमार उपाध्ये, बोर्डिंगचे चेअरमन प्रा. राहुल चौगुले, जैन महिला परिषदेच्या सेक्रेटरी अंजली कोले, कळंत्रे जैन महिलाश्रमच्या चेअरमन सौ. कमल मिणचे, सेक्रेटरी अनिता पाटील, चांदणी आरवाडे, गीतांजली उपाध्ये, सुवर्णा कागवाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments