Daily Mahasatta

Daily Mahasatta

एमपीएससी परिक्षा पुढे ढकलली, संतप्त विद्यार्थी रस्त्यावर

सांगली (प्रतिनिधी) : रविवार १४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा आयोगाची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय राज्य आयोगाने आज गुरुवार ता. ११ रोजी जाहीर केला, हा निर्णय जाहीर होताच महाराष्ट्रातील विविध शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यानी रस्त्यावर येऊन संतप्त निदर्शने केली.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा आयोगाने सलग पाचव्यांदा या परिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे  ढकलण्यात आल्या होत्या. आता याचा फटका एमपीएससी ची तयारी करणार्या मुलांना बसला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी पुणे, मुंबई यासह विविध लहान मोठ्या शहरात जाऊन अॅकडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. अकॅडमीची फी आणि राहण्याच्या खर्चाला लाखो रुपयांचे कर्ज देखील घेतलेले असते. मात्र या परिक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यामुळे अनेक मुलांचे भवितव्य अंधारात आले आहे. त्यामुळे पुणे शहरासह विविध ठिकाणी संतप्त  विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

---------------------------

पवारसाहेबांनी आमच्या पाठीमागे उभा रहावे...

पुणे येथे निदर्शन करणार्या विद्यार्थ्यांने थेट शरद पवार साहेबांना साद घातली आहे. निवडणूकीपूर्वी पवारसाहेब पावसात भिजले आणि त्यांच्या पाठीमागे अवघा महाराष्ट्र उभा राहिला. पवार साहेब आता आम्ही अडचणीत आहे, तुम्ही आमच्या पाठीशी उभा रहा, अशी आर्त हाक एका विद्यार्थ्यांने दिली आहे.

Post a Comment

0 Comments