Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

आयर्विनला समांतर पुलाचे काम सुरु करा अन्यथा आंदोलन : धीरज सूर्यवंशी

सांगली (प्रतिनिधी)
सांगली येथील आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम त्वरीत होणेबाबत निवेदन देऊन हि अद्याप पुलाचे काम चालू झाले नाही. याकरिता आज मिरज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व स्थानिक नागरिक यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबधित अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नसल्यामुळे हे ठिय्या आंदोलन तब्बल ४ तास सुरु होते.

आंदोलनाच्या दरम्यान आंदोलन कर्त्यांनी दुपारचे भोजन देखील आंदोलन स्थळीच केले. हे आंदोलन सुरु असताना आंदोलन कर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत परीसर दणाणून सोडला. त्यानंतर काही काळाने कार्यकारी अभियंता श्री रोकडे त्याठिकाणी उपस्थित झाले. यावेळी त्यांना आयर्विन पूलाला समांतर पुलाचे काम का रखडले आहे ? याचा जाब विचारला व तसेच मागील १ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर संभाजी माने व कार्यकारी अभियंता मिरज श्री संतोष रोकडे यांना निवेदन दिलेल्या पत्रात पुलाचे काम लवकरात लवकर समांतर पुल सुरू करा अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देऊनही पुलाचे काम सुरु झाले नाही.

तरी येत्या ४ दिवसात पुलाचे काम सुरु झाले नाही तर आम्ही २० मार्च रोजी सांगली बायपास शिवशंभो चौक येथे रस्ता रोको करून आंदोलन करणार आहे, असा इशारा युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी दिला.

यावेळी संघटक सरचिटणीस दीपक माने अल्पसंख्याक मोर्चा चिटणीस अशरफ वांकर, सचिव विश्वजित पाटील, युवा मोर्चाचे कृष्णा राठोड , चेतन मांडूगळकर, अमोल पाटील , दयानंद खोत , अजिंक्य हंबर , निलेश निकम , शांतीनाथ कर्वे , उमेश हारगे, महेश सागरे, प्रथमेश वैद्य , अमित देसाई, अनिकेत खिलारे अक्षय पाटील तसेच पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments