Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीकरांची ' जन्म - मृत्यू ' च्या फेऱ्यातून सुटका

सांगली : जन्म - मृत्यू विभागाच्या ऑनलाईन दाखल्याच्या उपक्रमाचे लोकार्पण करताना महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस.

: पाच मिनिटात मिळणार जन्ममृत्यू दाखला
: 1990 पासूनचे दाखले मिळणार ऑनलाईन

सांगली ( प्रतिनिधी)

सांगलीकर नागरिकांची ' जन्म - मृत्यू ' चा दाखला मिळविण्यासाठी माराव्या लागणार्या ' फेऱ्या ' पासून आता सुटका झाली असून हे दाखल केवळ एका क्लिक वर आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आज गुरुवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते महापालिकेच्या या ऑनलाईन दाखल्याच्या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष लक्ष देऊन जन्म मृत्यू दाखल्यासाठी नागरिकांनी होणारी गैरसोय आणि शासकीय कार्यालयात होणारे हेलपाटे हे थांबावेत आणि सुलभतेने त्यांना जन्म किंवा मृत्यूचे दाखले मिळावेत यासाठी ऑनलाईन जन्ममृत्यू दाखल्याची सोय केली आहे. यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील कोणताही नागरिक ऑनलाईन पद्धतींत आपला दाखला अवघ्या ५ मिनिटात प्राप्त करू शकणार आहे. यासाठी अवघे ५ रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.

यासाठी सांगलीच्या महापालिकेच्या वेबसाईटवर जन्म दाखल्याबाबतची सुविधा करण्यात आली असून या सुविधेचा शुभारंभ आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी ऑनलाईन पद्धतीने एक दाखला काढून त्याचे वितरणही करण्यात आले. या सुविधेमुळे महापालिका कार्यालयात दाखल्यासाठी रांगा लावाव्या लागणार नाहीत किंवा अधिकाऱ्यांची वाट बघावी लागणार नाही. आपल्या मोबाईलवरून सुद्धा आपण सांगली महापालिका क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू दाखला उपलब्ध करून घेऊ शकता अशी सोय करण्यात आली आहे.

यावेळी मनपा आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिकेच्या मंगल धाम इमारतीमधील जन्ममृत्यू दाखल्याच्या कार्यालयात होणारी गर्दी आणि नागरिकांची होणारी गैरसोय पाहता आम्ही दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तातडीने पाऊले उचलत आजपासून ऑनलाईन दाखले देण्याची सोय करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आता कोणत्याही नागरिकाला दाखला काढण्यासाठी महापालिका कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.

यावेळी उपमहापौर उमेश पाटील, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर , मैनुद्दीन बागवान ,उपायुक्त राहुल रोकडे , राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पावर, शेखर माने, मनपाचे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, नगरसचिव चंद्रकांत आडके आदी उपस्थित होते.

---------------------------
घरपट्टी भरण्यासाठी क्यूआर कोड उपलब्ध करुन देणार

जनतेची गैरसोय ओळखून आयुक्त कापडणीस आणि त्यांच्या टीमने केलेलं काम कौतुकास्पद आहे. या सुविधेचा नक्कीच जनतेला फायदा होईल आणि वेळेची बचत होईल. अशाच पद्धतीने घरपट्टी भरण्याबाबत सुद्धा नागरिकांच्या घरावर क्यूआर कोड उपलब्ध करून देऊन त्यावरून घरपट्टी भरण्याची सोय करण्याचे आमचे नियोजन आहे असे स्पष्ट केले.

दिग्विजय सूर्यवंशी
महापौर, सांगली मनपा

Post a comment

0 Comments