Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सय्यदवाडी परिसरात गवा रेड्याचे दर्शन, नागरिकात भितीचे वातावरण

शिराळा ( विनायक गायकवाड)
सय्यदवाडी (येळापुर ता. शिराळा) येथे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गवळेवाडीच्या बाजूने पाण्याच्या शोधात भर वस्तीतुन निनाई पठाराच्या बाजूस चाललेल्या गव्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळी ९ च्या सुमारास कराड - शेडगेवाडी राज्य मार्गाच्या गवळेवाडी कडील बाजूच्या ऊस, शाळू, हायब्रीडच्या पिकातून वाट काढत एक भला मोठा गवा येत असल्याचे संचित दिंडे या मुलाने पाहिले. कसला तरी मोठा म्हैशी सारखा प्राणी आपल्या घराच्या बाजूने जात असल्याचे घरातील लोकांना सांगितले. ते पाहण्यासाठी सर्वजण बाहेर आले असता हा गवा रेडा डोंगराच्या बाजूने जात होता. लोकांचा कलकलाट आणि हातवारे करण्याने गवा पळत गेला व तेथील पाझर तलावात पाणी पिऊन पुन्हा पठारावर असणाऱ्या निनाई मंदीराच्या बाजूने न थकता चढातून ही पळत सुटला.

सय्यदवाडी येथील शेकडो ग्रामस्थांच्यासह तिथे रक्षाविसर्जन साठी आलेल्या लोकांना देखील त्याचे दर्शन घडले. लोकांची आरडाओरड झाल्याने डोंगरातील झाडांच्या मधून वाट काढत गवा निघून गेला. सय्यदवाडी येथील मेणीचा ओढा परिसरातील शेतातून हा गवा आल्याने आणखी एखादा गवा असू शकेल काय याची शक्यता बनल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a comment

0 Comments