Daily Mahasatta

Daily Mahasatta

वाकुर्डे बुद्रुक व वारणा प्रकल्पासाठी प्रत्येकी शंभर कोटीची तरतूद : आ. मानसिंगराव नाईक

शिराळा (राजेंद्र दिवाण) : नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी व वारणा प्रकल्पासाठी प्रत्येकी शंभर कोटी रुपये प्रमाणे एकूण दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

ते म्हणाले, शिराळा मतदार संघातील जनतेने माझ्यावर लोकप्रतिनिधीत्वाची जबाबदारी दिल्या पासून मी नियोजनपूर्वक वाटचाल सुरु केली आहे. राज्यातील महाआघाडी सरकार व राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. ना. जयंतराव पाटील माझा पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. मंत्री पाटील यांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्पातून अशाच प्रकारे दोन्ही प्रकल्पासाठी शंभर शंभर कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातून दोन्ही प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी हातभार लागला आहे. आता पुन्हा यावर्षी तेवढ्याच रक्कमेची तरतूद केली आहे. वाकुर्डे बुद्रुक योजना पूर्ण करण्यासाठी माझ्या सततच्या मागणीला यश येत आहे. कोरोना संसर्ग काळातही महाआघाडी सरकार, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री पाटीलसाहेब यांनी जाणीवपूर्वक डोंगरी विभागाच्या विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. योजना पूर्ण करणे हे उद्दिष्ट ठेऊन माझी वाटचाल सुरू आहे. 

आमदार नाईक म्हणाले, ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांना शासनाकडून चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात या हेतूने मी २०१२ मध्ये येळापुर येथे खासबाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले होते. २०१४ मध्ये सरकार बदलल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच इमारत उभारणी सुरू होईल व या विभागातील नागरिकांना आरोग्याच्या सोई-सुविधा उपलब्ध होतील.

ते म्हणाले, मतदार संघाच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी मला सर्वांची साथ मिळत आहे. मतदार संघातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे. जनतेची वैयक्तिक व सार्वजनिक विकास मोठ्या प्रमाणावर करण्याचे काम नियोजनपूर्वक सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments