Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपुरात सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक संपन्न


सांगली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशन तयारी आढावा आणि महामंडळ संघटन मजबूतीसाठी इस्लामपुरात सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. आर. डी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

वाळवा एज्युकेशन सोसायटीचे अॅड. धैर्यशील पाटील यांनी स्वागत केले. महामंडळ खजिनदार रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ व महामंडळाच्या माध्यमातून खासगी संस्थांचे प्रश्न कसे सुटले व यापुढेही समस्या सोडविण्यासाठी संघटन मजबुतीचे महत्त्व स्पष्ट करुन वाळवा तालुक्यातील १००% संस्थांनी संघाचे लाईफ मेंबर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन कोरोना संसर्ग कमी होताच महामंडळ सुवर्ण महोत्सवी अधिवेशन होणार आहे. यासाठी वाळवा तालुक्यातील सर्व शिक्षण संस्था चालकांनी मदत करावी व अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. 

महामंडळ उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी बहुजन समाज शिक्षणात गेल्या ५० वर्षांत महामंडळाने दिलेल्या योगदानाचा धावता आढावा घेतला व संस्था संघटनांचे फलित विशद केले. कोल्हापूर विभागीय अध्यक्ष शिवाजी माळकर यांनीही संस्था चालक ऐक्यावर भर देऊन महामंडळ स्तरावरील उपक्रमांचा आढावा घेतला, सभासद वाढीसाठी वाळवा तालुका गतीमान होईल असा विश्वास व्यक्त केला. वशीचे अॅड. मारुती जाधव, इस्लामपूरचे डॉ. देशपांडे, डॉ. चोंचले, सी. एच. पाटील यांनी वाळवा तालुक्यातील संस्था चालक महामंडळ आणि जिल्हा संघाच्या उपक्रमात हिरीरीने पुढाकार घेतील असे आश्वस्त केले. यावेळी तालुक्यातील अन्य संस्थाचालकांनी मनोगतात समस्या मांडल्या. 

अॅड. चिमण डांगे, अॅड धैर्यशील पाटील आणि प्राचार्य आर. डी. सावंत यांनी एक महिन्यात सर्व संस्थांशी संपर्क करुन १००% सभासद करु आणि सर्वांना विश्वासात घेऊन तालुका कार्यकारिणी शिफारस संघाकडे देऊ असे सांगून वाळवा तालुका हा क्रांतिकारक देशभक्त व बहुजन समाज शिक्षणप्रेमी तालुका आहे. महामंडळ आणि जिल्हा संघाच्या पाठिशी हा तालुका भक्कमपणे उभा राहिल व येणाऱ्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनात तालुक्यातील सर्वच संस्था चालक उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले. संघाचे खजिनदार एस. के. पाटील, मुख्य प्रवक्ता विनोद पाटोळे, संघटक आर. एस. चोपडे, सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष एम. एस. रजपूत यांनी संघ आणि महामंडळामार्फत चाललेले उपक्रम, अधिवेशन, संस्था चालक समस्या, संघटनात्मक ऐक्याची गरज, गुणवत्ता वाढ याबाबतीत त्यांच्या मनोगतात उहापोह केला. 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सावंत म्हणाले, '' खासगी शिक्षण संस्थांनी महाराष्ट्र मोठा केला. बहुजनांची पोरं शिकली. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचा विचार पुढे नेला. अशा शिक्षण संस्था संघटनेचे मजबूत नेटवर्क तयार करु, तालुक्यातून १००% सभासद करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

अधिक वाचा :

सांगलीचे माजी आ. संभाजी पवार यांचे निधन

नाना पटोले यांचे गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन

काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी आशा पाटील
Post a Comment

0 Comments