Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली सिव्हिल हाॅस्पीटलसाठी ९३ कोटीचा निधी : आ. गाडगीळ

सांगली ( राजेंद्र काळे )
येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय परिसरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे २०० बेडच्या हॉस्पिटलसाठी ९३ कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे.

आमदार गाडगीळ म्हणाले, राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आणि राज्यातील मोठे प्रकल्प कार्यान्वीत करणे अशा कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगून मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे. नुकताच मुख्य सचिव पदाचा कार्यभार हाती घेतलेले सिताराम कुंटे यांची अधिवेशन काळात भेट घेऊन सांगलीच्या हॉस्पिटल बाबत माहिती दिली. त्यानुसार कुंटे यांनी हा सांगली जिल्ह्यातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावला आहे.

या अनुषंगाने गुरूवार ४ मार्च रोजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ९३ कोटी रूपयांचे विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी सांगली सोबत असणारे त्यांचे नाते जपत विशेष लक्ष घालत मान्यता दिली आहे. सांगली शहरातील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय परिसरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील २९ एकर जागा उपलब्ध असून या ठिकाणी खाटांचे महिला व नवजात शिशू रूग्णालय बांधण्यासाठी २०१३ मध्ये मान्यता प्राप्त झालेली होती. तथापी, सदरचा प्रकल्पा साठी आमदार गाडगीळ यांनी २०१८ पासून वारंवार पाठपुरावा करत सांगलीसाठी रखडलेला प्रकल्प मार्गी लावला आहे .

सांगली जिल्ह्यातील सदर प्रश्नांबाबत झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात असणाऱ्या मोकळ्या जागेत ४५ कोटी ९३ लाख रूपये अंदाजित खर्चाचे १०० खाटांचे (तळमजला + २ मजले असे ७ हजार ६६३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे) जिल्हा रूग्णालय व पोस्टमार्टम रूम बांधकाम करणे, ४६ कोटी ७४ लाख रूपये अंदाजित खर्चाचे १०० खाटांचे महिला नवजात शिशू रूग्णालय व धर्मशाळा बांधकाम करणे ,(तळमजला + २मजले असे ८ हजार ७८६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे) ची कामे मंजूर केल्याने सदरची कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंदाजित खर्चाच्या श्रेणीवर्धन करण्याच्या कामासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशा एकूण ९३ कोटी रूपये अंदाजित खर्चाच्या प्रकल्पाला मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली असल्याने सदरचे प्रकल्प मार्गी लागतील, असे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी म्हटले आहे

Post a comment

0 Comments