Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

आयर्विन पुलावरून दुचाकी वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा

पृथ्वीराज पाटील यांनी केले प्रयत्न 

सांगली : आयर्विन पुलावरील दुरुस्तीच्या कामाची पाहणी करताना  काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, महाबळेश्वर चौगुले, प्रभाकर पाटील, धनंजय पाटील, सांगलीवाडीतील नागरिक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी.

सांगली, (प्रतिनिधी) : आयर्विन पुलाच्या दुरुस्तीसाठी २४ फेब्रुवारीपासून पूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, त्यामुळे सांगलीवाडी आणि पश्चिम भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे, ती दूर करण्यासाठी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज नागरिकांशी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून पुलावरून सकाळी आणि संध्याकाळी दुचाकी वाहतूक सुरू करण्याचा तत्वतः होकार मिळवला आहे. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी श्री. अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय होईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

आयर्विन पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्यामुळे महिनाभरासाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बायपास रोडवरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वाढलेल्या वाहतुकीमुळे मोठी कोंडी होत आहे. छोटे-मोठे अपघात घडत आहेत. दोन- दोन तास वाहतूक ठप्प होत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ जात आहे, त्यांना मोठा त्रास होऊ लागला आहे. या भागातून विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यवसायिक यांची ये-जा असते. पूल बंद झाल्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.

 याकरिता काय मार्ग काढता येईल, यासाठी सांगलीवाडी व भागातील काही नागरिकांनी आज पृथ्वीराज पाटील यांची भेट घेतली. श्री. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, शाखा अभियंता शमशुद्दीन मुजावर, उपअभियंता अमर नलावडे यांच्यासमवेत तातडीने कामाची पाहणी केली आणि हा मुद्दा अधिकाऱ्यांना पटवून दिला. त्यांनीही या निर्णयाला तत्वतः संमती दिली. सकाळच्या सत्रात सहा ते दहा आणि सायंकाळी सहा पासुन पुढे या वेळेत दुचाकी वाहतुकीसाठी हा पूल खुला  ठेवता येईल या बाबत सर्वाचे एकमत झाले.

यावेळी माजी नगरसेवक दिलीप पाटील पोलीस पाटील महाबळेश्‍वर चौगुले, शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर पाटील, धनंजय पाटील, आनंदराव पाटील, भरत तांबेकर, विशाल पाटील, संग्राम पाटील, शिवाजी यादव, नितीन मोहिते, गणेश पाटील, युवराज पाटील, घोंगडे आदी उपस्थित होते.

सकाळी आणि संध्याकाळी पुलाचे काम चालू नसते त्यामुळे या काळात दुचाकी साठी वाहतूक चालू राहील आणि त्यानंतर दिवसभर पुलाच्या दुरुस्तीचे चालू राहील. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

Post a comment

0 Comments